वाहतूक शाखेच्या कारवाई विरोधात हिंगोलीत युवासेनेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 06:55 PM2018-02-22T18:55:20+5:302018-02-22T18:56:04+5:30
वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरातील रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले.
हिंगोली : वाहतूक शाखेच्या वतीने नियमांचे उल्लंघन केल्याच्या कारणाखाली चालकांकडून अन्यायकारक पद्धतीने दंड वसूल केला जात आहे. या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी इंदिरा गांधी चौक परिसरातील रस्त्यावर ठिय्या मांडून आंदोलन केले.
शहरात सध्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरुद्ध वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई सुरू आहे. विनापरवाना वाहन चालविणे, परवानगीपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहन चालविणे, विनाक्रमांकाची गाडी चालविणे, अवैध पार्किंग आदी नियमांचे उल्लंघन संदर्भात ही कारवाई सुरू आहे. आजही अशीच कारवाई ग्रामीण भागातील काही वाहनचालकांवर सुरू होती. मात्र या कारवाईत विनाकारण बारावीचे विद्यार्थी व ग्रामीण भागातील नागरिकांना त्रस्त केले जात असल्याचा आरोप करत युवा सेना जिल्हाप्रमुख दिलीप घुगे यांनी अचानक या विरोधात गांधी चौक येथे ठिय्या आंदोलन केले. यामुळे गांधी चौकातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
उल्लंघन करणा-यांवरच कारवाई
वाहतूक शाखेची कारवाई नियमित सुरू राहणार आहे. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणाचीही गय केली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणा-यांवरच कारवाई केली जाते.
- अशोक मैराळ, पोलीस निरीक्षक
परीक्षार्थ्यांना अडविल्याने आंदोलन
हिंगोलीत दररोजच वाहतूक शाखेतर्फे विविध कारणांनी लोकांना अडवून त्यांच्याकडून दंड वसूल केला जात आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यापेक्षा या शाखेला दंड वसूल करण्यात जास्त रस आहे. गांधी चौक ते अग्रसेन चौकात वाहतुकीची बेशिस्त सर्रास दिसते. यात सुधारणा केल्यास त्याचे आम्ही स्वागत करतो. मात्र याचा त्रास सध्या बारावीच्या परीक्षा देत असलेल्या विद्यार्थ्यांना होत आहे. त्यांना यांतून वगळावे यासाठी आमचे आंदोलन आहे.
- दिलीप घुगे, युवा सेना जिल्हाप्रमुख