जि.प. वसाहतीतील अंधार कायम; नाल्यांचे पाणी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:23 AM2021-05-30T04:23:59+5:302021-05-30T04:23:59+5:30
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वसाहतीत अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या भागातील पथदिवे सुरू आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर व घरासमोरील दिवे ...
जिल्हा परिषदेच्या कर्मचारी वसाहतीत अधिकाऱ्यांची निवासस्थाने असलेल्या भागातील पथदिवे सुरू आहेत. मात्र कर्मचाऱ्यांच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर व घरासमोरील दिवे बंदच आहेत. शिवाय समोरील भागातील रस्ते सोडले तर मागच्या भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. या रस्त्यांच्या कामासाठी कर्मचाऱ्यांनीही अनेकदा तक्रारी केल्या. मात्र त्यांचे कोणी ऐकायला तयार नाही. इमारतींचीही अनेक ठिकाणी किरकोळ डागडुजी करणे गरजेचे आहे. काही ठिकाणी तर शौचालयांचीही दुरवस्था झाली आहे. या इमारतीच्या बांधकामानंतर देखभालीकडे जि.प.च्या प्रशासनाचे अजिबात लक्ष नाही. त्यातच जि.प.चेच कर्मचारी येथे राहात असले तरीही त्यांना आवश्यक सुविधा मिळतात की नाही, याची चाचपणी करण्याचीही तसदी कोणी घेत नाही.
मागच्या वर्षी या इमारतीच्या दुरुस्तीची कामे काही प्रमाणात हाती घेण्याचे ठरले होते. मात्र तीच कामे न झाल्याने यंदा नवीन कामे कोरोनाच्या काळात निधी नसल्याने घेतली जातील का, याबाबत शंकाच आहे. दुसरीकडे जि.प.च्या इमारतीवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च होत आहे. पदाधिकाऱ्यांची दालने, अधिकाऱ्यांची दालने, फर्निचर, जि.प.च्या षटकोनी सभागृहाची दुरुस्ती अशा मलाईदार कामांकडेच सगळ्यांचे लक्ष असते. मात्र जि.प.च्या कर्मचाऱ्यांना याबाबत चकार शब्दही काढणे अवघड आहे. तर दुसरीकडे त्यांच्याच वसाहतीत अत्यंत दयनीय अवस्थेत त्यांना राहण्याची वेळ येत आहे. अधिकाऱ्यांच्या निवासस्थानांकडे तेवढे लक्ष दिले जात असल्याने त्यांनाही कर्मचाऱ्यांच्या अडचणींबाबत काही सोयरसूतक दिसत नाही. आता पावसाळ्यात या भागात तर पायी जाणेही अवघड बनते. त्यामुळे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.