जि.प.त सभेपूर्वीच वादाची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 12:10 AM2019-01-11T00:10:49+5:302019-01-11T00:11:06+5:30

जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली.

 In the ZP meeting, | जि.प.त सभेपूर्वीच वादाची फोडणी

जि.प.त सभेपूर्वीच वादाची फोडणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्हा परिषदेच्या गुरुवारच्या सर्वसाधारण सभेच्या पूर्वतयारीसाठी झालेल्या बैठकीत आरोग्य उपकेंद्राच्या मुद्यावरून जि.प. सदस्यांमध्ये जुंपल्याने अध्यक्षांच्या दालनात एकच गोंधळ उडाला. त्यामुळे ही सभा तहकूब करण्याची वेळ आली.
जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे यांच्या दालनात आयोजित केलेल्या या पूर्वतयारी बैठकीस सदस्यांचीच नव्हे, तर सदस्य पतींचीही मोठी उपस्थिती होती. सुरुवातीलाच जि.प. सदस्य संजय कावरखे यांनी उपाध्यक्ष अनिल पतंगे यांच्याशी वाद घातला. त्यानंतर दोघांत चर्चा झाल्याने कावरखे यांनी माघार घेतली. हा वाद थांबत नाही तोच शिवसेनेचे दोघेजण एकमेकांशी भिडले. जि. प. सदस्य श्रीशैल्य स्वामी व सारिका खिल्लारे यांचे पती नंदू खिल्लारे यांच्यात आरोग्य उपकेंद्राच्या मंजुरीवरून जुंपली. यामध्ये वाद विकोपाला गेल्याने इतरही सदस्यांनी सहभाग घेतला अन् एकच गोंधळ उडाला. नियोजन विभागाने निधीची तरतूद न करताच परस्पर २ उपकेंद्रांना मंजुरी दिली. यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकारांवर गंडांतर येत असल्याचा काही सदस्यांचा आक्षेप होता. तर काहीजण मंजुरीचेच काम झाले पाहिजे म्हणून बाजू घेत होते. मात्र हा प्रकार म्हणजे नियोजन विभागाची अनागोंदी की चिरीमिरीमुळे हे घडतेय, असा सवाल सदस्य करीत होते.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने दहा उपकेंद्र्रांची शिफारस केली होती. त्यापैकी शेवाळा व हाताळा ही दोन नावे आली. मात्र मोरवड व सेंदूरसना ही दोन नावे न सुचविता मंजूर झाली. यावरूनच ही बोंब उठली होती. यापूर्वी निधी नसताना मंजूर झालेल्या दोन शाळांचे काम जिल्हा परिषदेच्या सभागृहाने फेटाळले होते. शिवाय उपकेंद्रांसाठी केवळ १२0 लक्ष रुपयांचा निधी असल्याने दीडपट नियोजनात हे काम करणे शक्य नसल्याचे सदस्यांचे म्हणणे आहे. यामुळे मूळ कामांवर परिणाम होणार असल्याने ही कामे फेटाळण्याचीच तयारी दिसून येत आहे.
सभा तहकूब : दिवस ठरेना
एकीकडे हा वाद सुरू असताना दुसरीकडे अधिकारी सभागृहात येऊन बसले होते. मात्र तिकडे पदाधिकारी व सदस्य फिरकले नसल्याने सभा तहकूब करावी लागली. ही सभा कधी होणार यावर मात्र शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. सोमवारी ही सभा घेण्याचे नियोजन केले जात होते. मात्र आखाडा बाळापूर बाजार समितीच्या निवडणूक निकालाचे कारण काहीजण सांगत होते. यामध्ये सायंकाळी उशिरापर्यंत बैठकीवर कोणताच निर्णय झाला नसल्याचे दिसून आले. या वादाच्या चर्चेतच दिवस निघून गेला.
दरम्यान, जिल्हा परिषदेतील नियोजन समितीवरील सदस्यांचीही बैठक झाली. यामध्ये जि.प.ला त्रासदायक ठरत असलेले मुद्दे उपस्थित करण्यावर सदस्यांनी चर्चा केली.

Web Title:  In the ZP meeting,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.