सभापतीपदासाठी आज जि.प.त सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:38+5:302021-07-22T04:19:38+5:30
हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापतीपदासाठी २२ जुलै रोजी जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा होणार आहे. यात काँग्रेसकडून कैलास ...
हिंगोली : जिल्हा परिषद शिक्षण समिती सभापतीपदासाठी २२ जुलै रोजी जिल्हा परिषदेत सर्वसाधारण सभा होणार आहे. यात काँग्रेसकडून कैलास सोळुंके, तर राष्ट्रवादीकडून महादेव एकलारे यांच्या लढत होणार आहे. शिवसेनेसह एकमताने एकलारे यांचे नाव समोर आल्याने त्यांची निवड निश्चित मानली जात आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापतीपदावरून रत्नमाला चव्हाण यांना अविश्वासाने हटविल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. आठ ते दहा महिन्यांचाच काळ उरला असताना या पदासाठीही मोठी चुरस दिसून आली. राष्ट्रवादीतून यशोदा दराडे, संजय कावरखे यांच्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. त्यानंतर त्यात रिता दळवी यांनीही उडी घेतली. मात्र, त्यांनी फारसे प्रयत्नच केले नाहीत. दराडे यांच्यासाठी आ. राजू नवघरे हे आग्रही असले तरीही मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने त्यांना विरोध दर्शविला होता. यावर तोडगा काढण्यासाठी शासकीय विश्रामगृहावर २१ रोजी तब्बल चार तास बैठक चालली. आ. संतोष बांगर, आ. राजू नवघरे, माजी आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, राकाँ जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह जिल्हा परिषदेच्या सर्व सदस्यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, उपाध्यक्ष मनीष आखरे, सभापती फकिरा मुंडे, अनिल पतंगे, अंकुशराव आहेर, राजेंद्र शिखरे, राजेश्वर पतंगे आदींनी यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, एका नावावर एकमत होत नव्हते. शेवटी चाचपणीनंतर राष्ट्रवादीने पद हातचे जाऊ नये, यासाठी आ. राजू नवघरे यांचे निकटवर्तीय तथा त्यांच्या सर्कलमधील महादेव एकलारे यांचे नाव पुढे केले. त्यावर एकमतही झाले. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून एकलारे हे उमेदवार राहणार आहेत. काँग्रेसच्या कैलास सोळुंके यांना बहुमताचा जादुई आकडा पार करणे आता अवघड बनले आहे. मात्र, काही सदस्यांची फोडाफोड करण्यात ते यशस्वी झाले असले तरीही त्याचा फारसा फायदा होईल, अशी चिन्हे नाहीत. एकलारे हेच सभापतीपदी विराजमान होतील, असे स्पष्ट चित्र दिसत आहे. काँग्रेसच्या भाऊराव पाटील गोरेगावकर गटाची साथ एकलारे यांच्या बाजूने राहणार असल्याने सातव गटाच्या सोळुंके यांना पूर्ण तयारी असेल तरच मैदानात उतरणे सोयीचे ठरणार आहे. अन्यथा २३च्या पुढे आकडा सरकेल, असे दिसत नाही.