आशिया चषक हॉकी :भारतीय महिलांची विजयी ‘हॅट्ट्रिक’, मलेशियाचा २-० असा केला पराभव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 12:46 AM2017-11-01T00:46:22+5:302017-11-01T00:46:30+5:30
तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसरा विजय मिळवताना मलेशियाचा २-० असा पाडाव करुन आशिया चषक हॉकी स्पर्धेत जबरदस्त आगेकूच केली.
काकामिगहरा (जपान) : तुफान फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय महिला हॉकी संघाने सलग तिसरा विजय मिळवताना मलेशियाचा २-० असा पाडाव करुन आशिया चषक हॉकी स्पर्धेत जबरदस्त आगेकूच केली. पहिले तीन क्वार्टर्स गोलशून्य बरोबरीत राहिल्यानंतर अंतिम क्वार्टरमध्ये निर्णायक दोन गोल नोंदवत भारताने बाजी मारली.
या शानदार विजयासह भारतीय संघाने सर्वाधिक ९ गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहचला आहे. याआधी झालेल्या सामन्यात भारताने चीनचा ४-१ असा एकतर्फी पाडाव करत शानदार विजय मिळवला होता. मलेशियाविरुध्द वंदना कटारियाने ५४व्या मिनीटाला आणि गुरजीत कौरने ५५व्या मिनीटाला गोल करुन भारताचा विजय साकारला.
पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांनी बचावात्मक खेळ करताना धोका पत्करला नाही. मलेशियाने अधिक बचावात्मक पवित्रा घेतला. त्याचवेळी, भारताने कोणतीही घाई न करता अखेरपर्यंत संधी मिलण्याची प्रतीक्षा केली आणि मोक्याच्यावेळी आपला हिसका देत सामना जिंकला.
त्याचवेळी, दुसºया क्वार्टरमध्ये सुरुवातीलाच मलेशियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र रजनी इतिमार्पू हिने मलेशियाला गोल करण्यापासून रोखले. यानंतर दोन्ही संघांना पेनल्टी कॉर्नर मिळाले, मात्र गोल करण्यात कोणालाही यश आले नाही. तिसºया क्वार्टरमध्येही मलेशियाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे ते दडपणाखाली आले.
चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने चित्र पालटले. वंदनाने ५४व्या मिनिटाला मलेशियाच्या क्षेत्रात मुसंडी मारताना शानदार मैदानी गोल करत संघाला आघाडीवर नेले. यानंतर पुढच्याच मिनिटाला मिळालेली पेनल्टी कॉर्नर ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरने सत्कारणी लावत भारताचा दुसरा गोल साकारला. अखेरपर्यंत भारताने २-० ही आघाडी कायम राखताना विजयाची नोंद केली.