Asian Game 2018 : 32 वर्षीय सरदार सिंग विराट कोहलीपेक्षा फिट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:03 PM2018-08-16T12:03:05+5:302018-08-16T12:03:44+5:30
Asian Game 2018 : भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याला तंदुरूस्तीच्या कारणास्तव माजी प्रशिक्षक शोर्ड मरीन्ज यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता.
मुंबई - भारतीय पुरूष हॉकी संघाचा माजी कर्णधार सरदार सिंग याला तंदुरूस्तीच्या कारणास्तव माजी प्रशिक्षक शोर्ड मरीन्ज यांनी बाहेरचा रस्ता दाखवला होता. मागील दहा वर्षांत अनुभवी खेळाडू सरदारला प्रथमच संघाबाहेर बसावे लागले होते. त्यामुळे सरदारने पुन्हा एकदा आपल्या तंदुरूस्तीवर लक्ष केंद्रित केले. त्यांनंतर त्याने मागे वळून पाहिलेच नाही. यापुढे कोणालाही आपल्या तंदुरूस्तीवर बोट उचलता येणार नाही, याची दक्षता त्याने घेतली आहे.
मागील चार महिन्यांपासून सरदार स्वतःला पूर्णपणे तंदुरूस्त करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे आणि त्याने अखेर आशियाई स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान पटकावले. संघाचे सध्याचे प्रशिक्षक हरेंदर सिंग यांनी सर्वात अनुभवी खेळाडूला संघात पुन्हा स्थान दिले आहे. हे स्थान त्याने मागील कामगिरीच्या जोरावर नाही, तर स्वतःचा ताकदीवर मिळवले आहे. त्याने त्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. जिममध्ये त्याने बराच काळ घाम गाळला, स्टॅमिना व गती वाढवण्यासाठी विशेष वर्कआऊट केले.
'उसेन बोल्ट कशा प्रकारे कसरत करतो, हे मी पाहिले आणि त्याचे अनुकरण केले,'असे सरदारने सांगितले. नुकत्याच दिलेल्या Yo-yo चाचणीत त्याने 21.4 गुणांसह स्वतःचाच 21.3 गुणांचा विक्रम मोडला. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी yo-yo चाचणी घेतली जाते. त्यात खेळाडूची गती, सहनशक्ती आणि स्टॅमिना तपासला जातो. विशेष म्हणजे 32 वर्षीय सरदारने yo-yo चाचणीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीलाही पिछाडीवर टाकले आहे. कोहलीने चाचणीत 19 गुणांची कमाई केली होती. भारतासह, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूंमध्ये हे सर्वाधिक गुण आहेत.
सध्याच्या क्रिकेटपटूंमध्ये कोहली हा सर्वात तंदुरूस्त आहे, परंतु सरदारने त्याच्यावर मात केली. त्यावरून हॉकीसाठी कोणत्या दर्जाची तंदुरूस्ती लागते याचा अंदाज येतो.