हॉकी विश्वचषक जेतेपदाच्या हॅट्ट्रिकवर आॅस्ट्रेलियाची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 06:58 AM2018-11-29T06:58:29+5:302018-11-29T06:58:36+5:30
ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज असलेला गतविजेता आॅस्ट्रेलिया यंदाच्या हॉकी विश्वचषकात जेतेपद मिळवून हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने भारतात दाखल झाला आहे.
भुवनेश्वर : ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज असलेला गतविजेता आॅस्ट्रेलिया यंदाच्या हॉकी विश्वचषकात जेतेपद मिळवून हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने भारतात दाखल झाला आहे. असे झाल्यास २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकपर्यंत सरकारकडून त्यांना आर्थिक पाठबळ मिळणे कायम राहील.
आॅस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक कोलिन बॅच यांच्यामते विश्वचषकात संघाची कामगिरी ढेपाळल्यास आॅलिम्पिकची तयारी प्रभावित होईल. अशावेळी सरकारकडून अतिरिक्त आर्थिक साहाय्य रोखले जाण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय संघाच्या शानदार कामगिरीमुळे आॅस्ट्रेलियाच्या सरकारने हॉकीला २०२० पर्यंत अतिरिक्त आर्थिक साहाय्य देणे सुरू ठेवले आहे. आॅस्ट्रेलियाने २०१० आणि २०१४ मध्ये विश्वचषक आणि यादरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी तसेच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे देखील सुवर्ण जिंकले आहे.
शुक्रवारी कलिंग स्टेडियमवर आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यापूर्वी प्रशिक्षक बॅच म्हणाले,‘कामगिरी चांगली राहिली तरच आम्हाला आर्थिक पाठबळ सुरू राहील. २०२० च्या टोकियो आॅलिम्पिकपर्यंत सरकारकडून पाठबळ मिळत राहील, अशी आशा आहे. एखाद्या स्पर्धेत लवकर बाहेर पडलो तर त्याचा थेट प्रभाव पैसा मिळण्यावर पडतो. त्यामुळेच येथे चांगली कामगिरी करीत जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याचे लक्ष्य आखले आहे.’
‘सर्वोत्तम संघात भारत’
भारतीय हॉकीबद्दल बॅच म्हणाले, ‘भारताविरुद्ध आम्ही चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान खेळले होतो. त्यानंतर भारताने खेळात प्रगती साधली आहे. सर्वोत्कृष्ट संघांमध्ये भारताची गणना होत असल्याने येथे यजमान संघ चांगल्या कामगिरीच्या निर्धारानेच खेळणार आहे. त्यांच्यावर दडपणदेखील असेल. विश्व हॉकीत सर्वच संघ भारताचा मोठा आदर बाळगतात.’