अझलान शाह हॉकी; भारताला आयर्लंडविरुद्ध मोठ्या विजयाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:21 AM2018-03-09T02:21:07+5:302018-03-09T02:21:07+5:30
भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे.
इपोह - भारताचा युवा आणि अनुभवहीन संघ आज शुक्रवारी आयर्लंडविरुद्ध मोठा विजय नोंदविण्याच्या इराद्याने उतरणार असून, अंतिम फेरीच्या आशा कायम राखण्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही अनुकूल राहण्याची भारताला अपेक्षा आहे. पहिल्या तिन्ही सामन्यात अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या भारताने काल मलेशियावर ५-१ ने विजय साजरा केला होता.
त्याआधी आॅलिम्पिक विजेत्या अर्जेंटिनाने भारताला ३-२ ने आणि विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाने ४-२ ने नमविले होते. इंग्लंडविरुद्धचा सामना १-१ असा बरोबरीत सुटला. आॅस्ट्रेलिया चार सामन्यात चारही विजयासह अंतिम फेरीत दाखल झाला आहे. (वृत्तसंस्था)
भारताला आयर्लंडवर मोठ्या फरकाने विजय साजरा करावा लागेल; शिवाय आॅस्ट्रेलियाने अर्जेंटिनाला हरवावे आणि इंग्लंड-मलेशिया हा सामना बरोबरीत सुटावा, यावर भारताची पुढील वाटचाल विसंबून असेल. यंदा राष्टÑकुल आणि आशियाडसह चार मोठ्या स्पर्धांचे आयोजन आहे. यामुळे भारताने अनुभवी सरदारसिंग याच्या नेतृत्वात युवा संघ उतरविला आहे. मुख्य कोच शोर्ड मारिन मोठ्या स्पर्धांपूर्वी अनेक खेळाडूंना संधी देण्याच्या विचारात आहेत.
आयर्लंडवगळता अन्य चार संघांना अंतिम फेरीत स्थान मिळविण्याची बरोबरीची संधी आहे. आॅस्ट्रेलियाचे १२, अर्जेंटिनाचे सात, मलेशियाचे सहा, इंग्लंड पाच आणि भारताचे चार गुण आहेत. आयर्लंड संघ चारही सामन्यात पराभूत झाला.