अझलान शाह हॉकी; भारत आॅस्ट्रेलियाविरुद्ध भिडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 01:53 AM2018-03-06T01:53:39+5:302018-03-06T01:53:39+5:30
अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
इपोह (मलेशिया) - अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.
भारतीय संघाला सलामी लढतीत आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला होता, तर दुसºया लढतीत इंग्लंडविरुद्ध १-१ ने बरोबरीवर समाधान मानावे लागले. सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघ एका गुणासह चौथ्या स्थानी कायम आहे. दोन्ही सामन्यांत विजय मिळविणारा आॅस्ट्रेलिया संघ अव्वल स्थानी आहे. आॅस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ४-१ ने तर यजमान मलेशियाविरुद्ध ३-१ ने विजय मिळवला. भारताला मंगळवारी आॅस्टेÑलियाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला तर स्पर्धेत आव्हान कायम राखण्याच्या आशेला धक्का लागण्याची शक्यता आहे.
सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात भारताची कामगिरी निराशाजनक झाली. त्यात भारताने अनेक संधी गमावल्या. इंग्लंडविरुद्धच्या लढतीत भारतीय संघाने किमान ९ पेनल्टी कॉर्नर गमावले. भारतीय संघाला जर आॅस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवायचे असेल तर मिळालेल्या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)
दोन सामने शिल्लक
भारताला अखेरच्या दोन राऊंड रॉबिन लढतींमध्ये ७ मार्च रोजी यजमान मलेशिया व ९ मार्च रोजी आयर्लंडविरुद्ध खेळावे लागणार आहे.
मंगळवारच्या अन्य लढतींमध्ये इंग्लंडचा सामना आयर्लंडसोबत तर अर्जेंटिनाचा सामना स्थानिक संघासोबत होईल.