अझलन शाह हॉकी : भारताची अपयशी सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2018 01:47 AM2018-03-04T01:47:27+5:302018-03-04T01:47:27+5:30
ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने हॅट्ट्रिक साजरी करीत २७ व्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. अर्जेंटिनाने ३-२ अशा विजयासह आश्वासक सुरुवात केली.
इपोह : ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने हॅट्ट्रिक साजरी करीत २७ व्या सुल्तान अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत सलामीच्या सामन्यात भारताला पराभवाचा धक्का दिला. अर्जेंटिनाने ३-२ अशा विजयासह आश्वासक सुरुवात केली.
प्रमुख खेळाडूंना विश्रांती देत हॉकी इंडियाने या स्पर्धेसाठी तरुण खेळाडूंचा संघ निवडला आहे. पहिल्या सामन्यात भारताच्या तरुण खेळाडूंनी अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली, मात्र मोक्याच्या क्षणी दबाव झुगारण्यात अपयश येताच अर्जेंटिनाने बाजी मारली. मुख्य खेळाडू आकाशदीप सिंग, एस. व्ही. सुनील, मनदीप सिंग, मनप्रीत सिंग आणि गोलकीपर पीआर श्रीजेश हे संघात नाहीत, तर ड्रॅगफ्लिकर रूपिंदरपाल सिंग आणि हरमनप्रीत सिंग यांनादेखील विश्रांत देण्यात आली आहे.
अर्जेंटिनाचा ड्रॅगफ्लिकर गोंझालो पेयाटने अखेर गोलकोंडी फोडली. १३ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत पेयाटने आघाडी मिळवून दिली. यानंतर २४ व्या मिनिटाला गोंझालोने पुन्हा एकदा चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलत आघाडी २-० अशी केली. दुसरीकडे भारतीय खेळाडू गोलची संधी निर्माण करण्यात अपयशी ठरत होते. दुसºया सत्राच्या अखेरीस भारताला लागोपाठ तीन पेनल्टी कॉर्नरच्या संधी मिळाल्या. युवा ड्रॅगफ्लिकर अमित रोहिदासने २६ व्या मिनिटाला गोलकीपर विवाल्डीचा बचाव भेदत उजव्या कोपºयातून चेंडू गोलपोस्टमध्ये ढकलला. अमित रोहिदासच्या गोलमध्ये भारत चांगली लढत देईल, असे चित्र निर्माण झाले. मध्यंतरानंतर तिसºया सत्रात अमित रोहिदासने पुन्हा एकदा पेनल्टी कॉर्नरवर गोल करीत २-२ अशी बरोबरी साधून दिली. मात्र गोंझालो पेयाटने अमितपाठोपाठ दुसºया मिनिटाला गोल करीत अर्जेंटिनाला पुन्हा एकदा आघाडी मिळवून दिली. गोंझालोचा तिसरा गोल निर्णायक ठरला. अखेरच्या सत्रात पावसामुळे सामना काही काळ थांबविण्यात आला. मात्र मोक्याच्या क्षणी दडपणाखाली भारतीयांचा खेळ बहरलाच नाही. तरुण खेळाडूंव्यतिरिक्त एकाही अनुभवी खेळाडूने गोल करण्याच्या संधी निर्माण केल्या नाहीत. उद्या भारताची लढत इंग्लंडविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)
विवाल्डीचा सुरेख बचाव
पहिल्या सत्रात भारताच्या तरुण खेळाडूंनी अनपेक्षितरीत्या आक्रमक खेळ करीत अर्जेंटिनाच्या खेळाडूंना चांगलेच पेचात पाडले. नवोदित सुमित कुमार, तलविंदर सिंग, नीलम सेस यांनी काही चांगल्या मूव्ह करीत अर्जेंटिनाच्या गोलपोस्टवर हल्ले वारंवार केले.
मात्र अनुभवी गोलकीपर विवाल्डीने भारताचे सर्व हल्ले थोपवून लावले. त्यातच पहिल्या सत्रात अर्जेंटिनाच्या खेळाडूंनी बचावात क्षुल्लक चुका करीत भारतीय खेळाडूंना वरचढ होण्याचीही संधी दिली, मात्र सुदैवाने गोलकीपर विवाल्डीने अर्जेंटिनाचा गोलपोस्ट सुरक्षित ठेवला.