मलेशियाला नमवत भारताने जिंकले कांस्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 02:30 AM2017-10-30T02:30:00+5:302017-10-30T02:30:47+5:30
विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने आज येथे यजमान मलेशियाचा ४-0 असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले.
जोहोर बारू : विशाल अंतिल याने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने आज येथे यजमान मलेशियाचा ४-0 असा पराभव करताना सुल्तान जोहोर चषक स्पर्धेत कास्यपदक जिंकले.
तमन दया हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या या लढतीत भारताकडून अंतिलने १५ व्या आणि २५ व्या मिनिटाला असे दोन गोल केले. भारताला विवेक प्रसादने ११ व्या मिनिटाला गोल करीत आघाडी मिळवून दिली, तर शैलानंद लाकडाने २१ व्या मिनिटाला संघाकडून तिसरा गोल केला. अशा प्रकारे भारताने कास्यपदक जिंकताना या स्पर्धेचा समारोप केला.
त्याआधी भारत ९ गुणांसह गुणतालिकेत तिसºया स्थानावर राहिला होता. त्यांनी आज शानदार सुरुवात करताना पहिल्या क्वार्टरमध्ये मलेशिया गोलपोस्टवर जोरदार हल्ले केले. फायनलमध्ये न पोहोचण्यामुळे झालेली निराशा विसरताना भारतीय संघाने आपल्या कौशल्याचे जोरदार प्रदर्शन केले. कर्णधार विवेक प्रसादने ११ व्या मिनिटाला मनिंदरसिंहच्या पासवर गोल करताना संघाचे खाते उघडले. चार मिनिटांनंतर दिलप्रीतसिंहच्या मोठ्या पासवर शैलानंद लकडाने चांगल्याप्रकारे नियंत्रण मिळवले आणि पुन्हा त्यांनी विशाल अंतिलकडे हा पास दिला आणि अंतिलने त्यावर सहज गोल केला.
दुसºया क्वार्टरमध्येदेखील याचीच पुनरावृत्ती झाली आणि भारतीयांनी दबाव ठेवला. खेळाच्या २१ व्या मिनिटाला विवेक प्रसादच्या पासवर शैलानंदने तिसरा गोल केला. त्यानंतर भारतीय संघाने प्रतिस्पर्ध्यांना डोके वर काढण्याची संधी दिली नाही आणि २५ व्या मिनिटाला दिलप्रीतच्या पासवर विशालने गोल करीत भारताची आघाडी ४-0 अशी केली. मलेशियाने पुढील दोन क्वार्टरमध्ये मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला; परंतु भारतीय बचावफळीने त्यांना संधी दिली नाही. भारतीय गोलकिपर सेंतामिज शंकरनेदेखील खूप चांगला बचाव करताना भारतीय संघाच्या विजयात योगदान दिले. (वृत्तसंस्था)