आशियाडमध्ये पदक जिंकणे आव्हानात्मक - सरदारसिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 06:15 AM2018-08-12T06:15:14+5:302018-08-12T06:15:28+5:30
मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे.
नवी दिल्ली : मागच्या आशियाडमध्ये सुवर्ण पदक जिंकून भारताला थेट आॅलिम्पिक पात्रता मिळवून देणारा माजी कर्णधर आणि मधल्या फळीचा आधारस्तंभ सरदारसिंग याने इंडोनेशियात सुवर्ण जिंकणे भारतीय संघासाठी आव्हानात्मक असेल, असे म्हटले आहे. भारतीय संघ आशियाई देशांमध्ये प्रबळ दावेदार म्हणून खेळणार असला तरी सर्वोत्कृष्ट कामगिरी करावीच लागेल, असे सरदारचे मत आहे.
तो म्हणाला, ‘भारत या स्पर्धेत सर्वांत प्रबळ दावेदार म्हणून उतरणार असला तरी मैदानावर सर्वोत्कृष्ट योगदान द्यावे लागेल. येथे सुवर्ण जिंकून टोकियो आॅलिम्पिकची थेट पात्रता गाठणे कडवे आव्हान असेल. आम्ही अलीकडे कोरिया आणि न्यूझीलंडविरुद्धची मालिका तसेच एफआयएच चॅम्पियन्स ट्रॉफीत चांगले निकाल दिले. पण अनेक क्षेत्रांत सुधारणेस वाव आहे. सराव शिबिरादरम्यान उणिवा दृूर करू.’
खेळाडू आशियाडबद्दल रोमांचित असून कोचने जे सांगितले त्यावर काम केल्यास आणि बेसिक्सवर कायम राहून खेळ केल्यास आशियाई संघांमध्ये आम्ही सरस ठरू शकतो. चॅम्पियन्स ट्रॉफीत रौप्य पदक मिळाल्याने आशियाडमध्ये सुवर्ण जिंकण्याचा आत्मविश्वास मिळाला. चॅम्पियन्स ट्रॉफीत आम्ही दिग्गज खेळाडूंना नमविल्याने आशियाडमध्ये आणखी दमदार कामगिरी करण्याचा विश्वास लाभला. पण त्याचवेळी कुठल्याही संघाला सहज घेण्याची आम्ही चूक करणार नाही.’
हरेंद्रसिंग कोच बनल्यामुळे संघावर काय परिणाम होईल, असे विचारताच सरदार म्हणाला, ‘आमच्या संघात झुंजारवृत्ती आली आहे. खेळाडूंमध्ये समन्वय असून मैदानावर त्याचा लाभ होईल. हरेंद्रसिंग यांना मी १५ वर्षांपासून ओळखतो. तेदेखील माझ्या खेळातील बलस्थाने आणि उणिवा जाणतात. सिनियर या नात्याने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देणे माझे कर्तव्य आहे. याच गोष्टींमुळे माझा आत्मविश्वाास उंचावतो.’ (वृत्तसंस्था)
ओडिशा येथे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये आयोजित विश्वचषकाबद्दल विचारताच सरदार म्हणाला, ‘यंदा आशियाडनंतर आम्हाला विश्वचषक खेळायचा आहे. विश्वचषक महत्त्वपूर्ण असून सध्या तरी आमचे लक्ष आशियाडच्या सुवर्णावर आहे. त्यानंतर आशियाडची तयारी करू.’