चक दे! चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताकडून पाकिस्तानचा धुव्वा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2018 08:17 PM2018-06-23T20:17:18+5:302018-06-23T20:18:47+5:30
स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानला 4-0नं लोळवलं
ब्रेडा: भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला आहे. पहिल्याच सामन्यात सफाईदार विजय मिळवत भारतानं स्पर्धेची झोकात सुरुवात केली. नेदरलँडमधील ब्रेडा येथे ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. भारताच्या या विजयात रमनदीप सिंग, दिलप्रीत सिंग आणि मनदीप सिंग यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
रमनदीप सिंगनं 26 व्या मिनिटाला गोल करत भारताला चांगली सुरुवात करुन दिली. सामन्याच्या पूर्वार्धात पाकिस्ताननं चांगला खेळ केला. मात्र त्यांना गोल करण्यात अपयश आलं. पहिल्या सत्रात भारतानं दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. मात्र या दोन्ही पेनल्टी कॉर्नरचं गोलमध्ये रुपांतर करण्यात भारताला अपयश आलं. भारताच्या आक्रमणपटूंनी अनेकदा प्रतिस्पर्ध्यांच्या गोलपोस्टवर धडक दिली. तर भारतीय बचावपटूंनी पाकिस्तानचं आक्रमण मोडून काढण्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली.
सामन्याच्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये भारतीय संघाच्या आक्रमणाला आणखी धार दिली. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये भारतानं तीन गोल डागले. दिलप्रीत सिंगनं 54 व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी केल्यावर मनदीप सिंगनं 57 मिनिटाला संघाचा तिसरा गोल केला. यानंतर रमनदीपनं 60 व्या मिनिटाला स्वत:चा सामन्यातील दुसरा आणि संघाचा चौथा गोल नोंदवला. पहिलीवहिली चॅम्पियन्स हॉकी ट्रॉफी जिंकण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताचा पुढील सामना अर्जेंटिनाविरुद्ध होईल.