कोच रोलँट ओल्टमन्स यांची हकालपट्टी, हॉकी इंडियाकडून कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 05:49 AM2017-09-03T05:49:11+5:302017-09-03T05:49:11+5:30
हॉकी इंडियाने शनिवारी राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी केली. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स’ संचालक डेव्हिड जॉन सध्या अंतरिम कोच म्हणून कामकाज पाहतील.
नवी दिल्ली : हॉकी इंडियाने शनिवारी राष्ट्रीय संघाचे मुख्य कोच रोलँट ओल्टमन्स यांची खराब कामगिरीबद्दल हकालपट्टी केली. संघाचे ‘हाय परफॉर्मन्स’ संचालक डेव्हिड जॉन सध्या अंतरिम कोच म्हणून कामकाज पाहतील. हॉकी इंडियाच्या हाय परफॉर्मन्स आणि विकास समितीच्या तीन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉकी इंडियाच्या निवड समितीचे प्रमुख हरविंदरसिंग म्हणाले, ‘आम्ही २०१६ आणि २०१७ या मोसमातील पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीवर समाधानी नाही. आशियातील विजय हा यशाचा मापदंड होऊ शकत नाही, असे आमचे मत आहे. आम्हाला गेली दोन वर्षे आंतरराष्टÑीय स्पर्धांमध्ये हवे तसे यश मिळाले नाही. यशासाठी आम्हाला कठोर निर्णय घ्यावेच लागतील. कोचिंगची सध्याची पद्धत एका मर्यादेपेक्षा अधिक यश मिळवून देऊ शकत नाही. यावर लगेच
तोडगा काढायची गरज आहे.
बदल एका रात्रीतून होत नाही.
२०१८ चे आशियाड, विश्वकप
आणि २०२० च्या आॅलिम्पिकमध्ये देदीप्यमान यशासाठी आमूलाग्र बदल आवश्यक आहेत.’
‘वारंवार
कोच बदलणे नुकसानदायक’
नवी दिल्ली : रोलँट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीवर आश्चर्य व्यक्त करून भारतीय हॉकी संघाचे माजी कोच जोस ब्रासा यांनी वारंवार कोच बदलणे भारतीय संघाच्या हिताचे नसल्याचे म्हटले आहे.
२००९-१० या मोसमात भारताचे कोच राहिलेले ब्रासा यांनी स्पेनमधून वृत्तसंस्थेशी बोलताना ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीबाद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले, ‘‘रोलँट जगातील सर्वोत्कृष्ट कोच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत चांगला खेळत होता. त्यांचा पर्याय शोधणे कठीण असेल.’’
ब्रासा यांच्यासोबतदेखील हॉकी इंडियाने दोन वर्षांचा करार केला होता; पण ग्वांग्झू एशियाड (२०१०)नंतर त्यांची हकालपट्टी झाली होती. युक्रेनच्या राष्टÑीय महिला संघाचे सल्लागार असलेले ब्रासा म्हणाले, ‘‘वारंवार कोच बदलल्याने संघाच्या कामगिरीवर विपरीत परिणाम होतो.’’
हॉकी इंडियात खेळाची पार्श्वभूमी लाभलेल्या लोकांचा अभाव, हीच भारतात मुख्य समस्या असल्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
हॉकी चालविणाºयांना खेळाची माहिती नाही. जगभर होत
असलेल्या बदलाची माहिती नसणे, हे मूळ कारण आहे. भारताला देशी
नव्हे, तर विदेशी कोचचीच गरज असल्याचे मत त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी दिले.
भारतात एकही हॉकी विद्यापीठ नाही. विदेशी कोच आधुनिक माहितीसह अनुभव सोबत घेऊन येतो, असे त्यांनी स्वत:चा मुद्दा पुढे रेटताना सांगितले. भारतात हॉकी प्रतिभेची उणीव नाही; पण त्यांना आधुनिक प्रशिक्षण देणारे मार्गदर्शक नाहीत. भारतीय संघ विश्वचषकाचा प्रबळ दावेदार होण्यासाठी कोचला अधिक वेळ देणे गरजेचे आहे, असे ब्रासा यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)
गेल्या काही वर्षांत सात कोच बदलले गेले. नेदरलँड्सचे पॉल वॉन अॅस, आॅस्ट्रेलियाचे टेरी वॉल्श, मायकेल नोब्स आणि रिक चार्ल्सवर्थ यांनादेखील वादग्रस्त स्थितीत निरोप देण्यात आला. विश्व दर्जाच्या संघबांधणीसाठी दीर्घ काळासाठी कोचची नियुक्ती व्हायला हवी. ही ‘जादूची छडी’ नाही. खेळाडूंना समजून घ्यायला बराच वेळ लागतो.
-जोस ब्रासा, माजी कोच भारत