'संवादहीनता संपली, अडथळा नाहीच'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 03:04 AM2018-08-11T03:04:11+5:302018-08-11T03:04:22+5:30
भारतीय हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडू सरदार सिंग आणि मनप्रीतसिंग यांनी प्रशिक्षक विदेशी नसल्यामुळे संवाद साधण्यात अडथळे उद्भवणार नाही.
नवी दिल्ली : भारतीय हॉकी संघातील वरिष्ठ खेळाडू सरदार सिंग आणि मनप्रीतसिंग यांनी प्रशिक्षक विदेशी नसल्यामुळे संवाद साधण्यात अडथळे उद्भवणार नाही. हरेंद्रसिंग हे विदेशी प्रशिक्षकाच्या तुलनेत डावपेच आखण्यात कुठेही कमी नसल्याचे म्हटले आहे.
हरेंद्रसिंग यांची मे महिन्यामध्ये पुरुष हॉकी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली. त्यांच्या उपस्थितीत मागच्या महिन्यात भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपद पटकविले. वृत्तसंस्थेशी बोलताना सरदार म्हणाला,‘१५-१६ वर्षांपूर्वी हरेंद्र यांनी मला राष्टÑीय शिबिरात पाचारण केले होते, हे अद्याप स्मरणात आहे. आम्ही दीर्घ काळापासून एकमेकांना जाणतो. २००९ मध्ये जोस ब्रासाचे सहायक असताना मी हरेंद्र यांच्या मार्गदर्शनात खेळलो आहे. भारतीय प्रशिक्षकासोबत काम करणे वेगळी अनुभूती आहे. आम्ही त्यांच्यासोबत कुठल्याही विषयावर बोलू शकतो आणि ते देखील मोकळेपणाणे सल्ला देऊ शकतात. सिनियर खेळाडू या नात्याने आम्ही स्वत:चा खेळ पूर्णपणे बदलू शकत नाही. सरावादरम्यान काही समजाविण्यास कोचकडे वेळ असतो. विदेशी कोच दोन क्वार्टरच्या मध्ये दोन मिनिट ब्रेक दरम्यान सल्ला देतो. हा सल्ला समजणे कठीण असते. हरेंद्र यांच्या नियुक्तीमुळे भाषेचा प्रश्न देखील संपुष्टात आला आहे.’
सरदार पुढे म्हणाला, ‘हरेंद्र यांनी महिला आणि ज्युनियर संघांसोबत चांगले निकाल दिले आहेत. ज्युनियर संघाने विश्वचषक तर त्यांच्याच मार्गदर्शनात जिंकला. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षकांसोबत त्यांनी काम केले आहे. सकारात्मक बाब अशी की आता आम्ही हिंदीत संवाद साधू शकतो. विदेशी कोचसोबत दोन मिनिटे चर्चा केल्यानंतर मैदानात काही मुद्दे विसरले की भ्रमिष्ट स्थिती होते. प्रशिक्षक बाहेरून खेळ पाहतो आणि स्वत:च्या भाषेत मार्गदर्शन करतो. त्यांची भाषा आणि तुमची भाषा वेगळी असल्याने ताळमेळाअभावी चुका होतात. हरेंद्र यांच्या उपस्थितीमुळे आता भीती नाहीशी झाली आहे.’
>शैली न बदलण्याची प्रशिक्षकाला अपेक्षा
मनप्रीत म्हणाला, ‘नव्या प्रशिक्षकासह खेळताना खेळाडूंनी खेळाची शैली बदलू नये अशी प्रशिक्षकाला अपेक्षा असते. आमची ताकद हल्ले करणे व प्रतिस्पर्धी खेळाडूंना रोखून धरणे आहे. हरेंद्र यांना सुनील व आकाशदीपसारख्या खेळाडूंच्या वेगवान खेळाचा उपयोग कसा करायचा हे माहिती आहे. विशेष म्हणजे मोठमोठ्या प्रशिक्षकांसोबत काम केल्यानंतरही ‘मी तर अद्याप शिकत आहे, हे हरेंद्र यांचे उद्गार ते अद्याप जमिनीवर असल्याची साक्ष देतात.’