युरोप दौ-याने आत्मविश्वास वाढला, भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आकाश चिकटेचे मत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 03:09 AM2017-08-25T03:09:04+5:302017-08-25T03:09:32+5:30
वरिष्ठ खेळाडूंना दिलेली विश्रांती, सहा नवीन खेळाडू, पुढे बलाढ्य नेदरलॅण्ड, बेल्जियम संघ. अशा विपरित परिस्थितीत भारतीय हॉकी संघाने युरोप दौ-यात चमकदार कामगिरी केली.
- नीलेश भगत ।
यवतमाळ : वरिष्ठ खेळाडूंना दिलेली विश्रांती, सहा नवीन खेळाडू, पुढे बलाढ्य नेदरलॅण्ड, बेल्जियम संघ. अशा विपरित परिस्थितीत भारतीय हॉकी संघाने युरोप दौ-यात चमकदार कामगिरी केली. या दौ-यातून भारतीय संघाला मिळालेला आत्मविश्वास आगामी आशिया कप स्पर्धेसाठी फायदाचा ठरेल, असे भारतीय हॉकी संघाचा गोलरक्षक आणि यवतमाळचे सुपूत्र आकाश चिकटे याने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आकाश युरोप दौरा आटपून स्वगृही यवतमाळत आला असता त्याने युरोप दौºयाच्या आठवणींना उजाळा दिला.
तो म्हणाला, हॉकी संघात सरदार सिंग, एस.व्ही. सुनील, पी.श्रीजेश या वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. तर सहा खेळाडू प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळत होते. त्यातही नेदरलॅण्ड, बेल्जियम, आॅस्ट्रीया असे बलाढ्य प्रतिस्पर्धी होते. भारतीय संघात नवखे युवा खेळाडू असल्याने आत्मविश्वासाची कमतरता होती. अशा विपरित परिस्थितीत चमकदार कामगिरी करीत युरोप दौरा गाजविला. या दौºयात प्रतिस्पर्धी संघांना भारताविरुद्ध २५ पेक्षा जास्त पेनॉल्टी कॉर्नर मिळाले. परंतु त्यांना केवळ तीनच गोलच करता आले. यावरून युवा संघाच्या कामगिरीचे मुल्यमापन करता येईल, असे आकाश चिकटे म्हणाला.
युरोप दौºयात भारतीय संघ बेल्जियम विरुद्ध दोन्ही सामने चांगले खेळूनही हरला, तर नेदरलॅण्ड व आॅस्ट्रीया विरुद्धचे सामने जिंकता आले. युरोपियन हॉकीपटू आशियायी देशातील संघापेक्षा वेगवान आहेत. त्यांचे हॉकीतील कौशल्य, गेम प्लॅन सरस आहेत. या दौºयातून आम्ही कुठे कमी आहोत, ते कळले. युरोपच्या वातावरणात खेळण्याचा आम्हाला भविष्यात निश्चित फायदा होईल. असा विश्वास आकाशने व्यक्त केला.
पेनॉल्टी कॉर्नरवर सर्वाधिक सराव
या दौºयापूर्वी कोच आॅल्टमन्स यांनी आमच्याकडून पेनॉल्टी कॉर्नरवर खूप सराव करून घेतला. त्याचा मोठा फायदा झाला. प्रतिस्पर्धी संघांना २५ पेक्षा जास्त पेनॉल्टी कॉर्नर मिळूनही त्यांना केवळ तीनदाच यश मिळाले. नेदरलॅण्डचा ड्रॅग फ्लिकर व्हॅँडोरस पेनॉल्टी कॉर्नरवर हमखास गोल करणारा म्हणून जगप्रसिद्ध आहे. त्याचे विरुद्ध आम्ही विशेष व्युहरचना केली ती मैदानात यशस्वी ठरली. भारता विरुद्ध पेनॉल्टी कॉर्नरवर त्याला एकही गोल करता आला नाही.
३६ वा आंतरराष्ट्रीय सामना
आकाश म्हणाला, माझा हा ३६ वा आंतरराष्ट्रीय सामना होता. माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला असून देशासाठी अधिक चांगली कामगिरी करण्याचा तसेच वर्ल्ड कप व आॅलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याचे धेय्य आहे. टोकियो आॅलिम्पिकच्या तयारीसाठी भारतीय हॉकी संघटनेने ३३ खेळाडू निवडले आहेत. युरोप दौºयातील खेळाडू या निवडक खेळाडूमधीलच होते. पुढील वर्षात वर्ल्ड कप, कॉमनवेल्थ व एशियन गेम्स आहेत. या दौºयाचा आम्हाला या स्पर्धेसाठी निश्चित फायदा होईल, असे आकाश चिकटे याने सांगितले.