CoronaVirus News : कोरोनाग्रस्त स्वयंपाकी खेळाडूंच्या संपर्कात नव्हता- हॉकी इंडिया
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2020 02:02 AM2020-05-21T02:02:38+5:302020-05-21T02:02:59+5:30
CoronaVirus News in Marathi and Live Updates : भारताच्या दोन्ही हॉकी संघांनी टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. हॉकी इंडियाच्या सीईओ एलिना नॉर्मन यांंनी सांगितले की, ‘येथे देशातील सर्वोत्तम सुविधा उपलब्ध असल्याने येथून संघांना हलविण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही.
नवी दिल्ली : बंगळूरु येथील भारतीय क्रीडा प्राधिकरण केंद्रात (साई) काम करणाऱ्या स्वयंपाक्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मात्र यानंतरही येथे वास्तव्यास असलेल्या भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघाच्या स्थलांतरित करण्याच्या शक्यता हॉकी इंडियाने फेटाळून लावल्या. कोरोनाग्रस्त स्वयंपाकी खेळाडूंच्या संपर्कात आला नव्हता, असे हॉकी इंडियाने स्पष्ट केले आहे.
भारताच्या दोन्ही हॉकी संघांनी टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठली आहे. हॉकी इंडियाच्या सीईओ एलिना नॉर्मन यांंनी सांगितले की, ‘येथे देशातील सर्वोत्तम सुविधा उपलब्ध असल्याने येथून संघांना हलविण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. जरी याविषयी विचार केला तरी सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे हे अशक्य आहे.’ ‘साई’च्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ‘हा स्वयंपाकी १० मार्चपासून प्रवेशद्वाराच्या आसपासच्या क्षेत्रापुढे गेला नव्हता.’
या अधिकाºयाने पुढे सांगितले की, ‘एक स्वयंपाकी जो सुमारे ६० कर्मचाऱ्यांचा भाग होता आणि ज्याला अधिक वयामुळे १० मार्चपासून घरीच राहण्यास सांगितले होते, त्याचे रुग्णालयात हृदयविकाराने निधन झाले. आपल्या एका नातेवाईकाच्या नवजात मुलाला पाहण्यासाठी तो रुग्णालयात गेला होता आणि तिथे त्याला हृदयविकाराचा झटका आला. यानंतर नियमानुसार केलेल्या चाचणीमध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह आढळला.’ (वृत्तसंस्था)