coronavirus: ‘आम्ही ऑलिम्पियन नव्हे, ऑलिम्पिक विजेत्या बनू इच्छितो’ -निक्की प्रधान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 05:59 AM2020-05-13T05:59:58+5:302020-05-13T06:00:22+5:30
२०१६ चा अनुभव सर्व खेळाडूंसाठी मोठा होता. ३६ वर्षानंतर पात्रता गाठता आली ही सुरुवात होती. टोकियो आॅलिम्पिकची पात्रतादेखील नोव्हेंबरमध्ये अमेरिकेवर मात करीत गाठली.
बेंगळुरू : टोकियो आॅलिम्पिकमध्ये भारताचा महिला हॉकी संघ पदक जिंकण्यासाठी कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही, असा विश्वास मिडफिल्डर निक्की प्रधान हिने व्यक्त केला आहे. ‘आम्ही आॅलिम्पियन नव्हे, आॅलिम्पिक विजेत्या बनू इच्छितो’, असेही निक्कीने ठासून सांगितले. भारताच्या महिला हॉकी संघाने रिओ आॅलिम्पिकची(२०१६)३६ वर्षानंतर पात्रता गाठली होती.
निक्की म्हणाली, ‘२०१६ चा अनुभव सर्व खेळाडूंसाठी मोठा होता. ३६ वर्षानंतर पात्रता गाठता आली ही सुरुवात होती. टोकियो आॅलिम्पिकची पात्रतादेखील नोव्हेंबरमध्ये अमेरिकेवर मात करीत गाठली. पाठोपाठ आॅलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याची भारताची ही दुसरी वेळ आहे. मी नेहमी पदकाचे स्वप्न पाहिले. आॅलिम्पिक पदक विजेती खेळाडू अशी ओळख निर्माण करायची आहे. त्यादृष्टीनेच प्रयत्न करणार, यात शंका नाही.’
झारखंडच्या हेसल या लहानशा गावातून सुरुवात केल्यानंतर आॅलिम्पिकपर्यंतचा प्रवास करणाऱ्या निक्कीने खुंटी जिल्ह्यात शिक्षण पूर्ण केले. मर्यादित साधने असतानादेखील निक्कीच्या परिसरातून भारतीय हॉकीला अनेक खेळाडू गवसले. कठोर मेहनत आणि निकटवर्तीयांच्या पाठिंब्यामुळे निक्की व्यावसायिक खेळाडू बनू शकली. राज्याचे प्रतिनिधित्व करीत चमक दाखविल्यामुळे लवकरच तिला राष्टÑीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाली. झारखंडमध्ये हॉकीला पुन्हा एकदा चांगले दिवस आल्याचे मत निक्कीने व्यक्त केले.
भारताकडून ११० आंतरराष्टÑीय सामने खेळलेली ही खेळाडू पुढे म्हणाली, ‘मी आणि सलिमा टेटे एकाच जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतो. आम्हा दोघींचा खेळ बघून झारखंडचे खेळाडू किती प्रतिभावान आहेत याची कल्पना करू शकता. गेल्या काही वर्षांत आम्हा दोघींचा खेळ चांगलाच बहरला. खेळाडू गंभीर असतील तर खेळाची प्रगती होणारच, हे भारतीय महिला हॉकी संघाकडे बघून म्हणता येईल. भविष्यात गाव खेड्यातील अनेक प्रतिभावान हॉकीपटू भारतीय संघाला मिळतील, असा मला विश्वास वाटतो.’ (वृत्तसंस्था)