भारतीय हॉकी संघाची दिवाळी भेट, मलेशियाचा उडवला ६-२ गोलने धुव्वा, आशिया चषक हॉकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:36 AM2017-10-20T01:36:34+5:302017-10-20T01:36:52+5:30
भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली.
ढाका : भारतीय हॉकी संघाने आपली जबरदस्त विजयी घोडदौड कायम ठेवताना आशिया चषक हॉकी स्पर्धेत मलेशियावर ६-२ गोलने धुव्वा उडवला. त्याचबरोबर भारतीय हॉकी संघाने चाहत्यांना अनोखी दिवाळी भेट दिली. आता भारताची लढत शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे.
भारतीय हॉकी संघाने जबरदस्त आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत प्रतिस्पर्धी संघाला डोके वर काढण्याची उसंत मिळू न देता तब्बल
५ मैदानी गोल केले. भारताकडून हे ५ मैदानी गोल आकाशदीपसिंग (१५ व्या मिनिटाला), एस. के. उथप्पा (२४ व्या मिनिटाला), गुरजंतसिंग (३३ व्या मिनिटाला), एस. व्ही. सुनील (४० व्या) आणि सरदार सिंग (६० व्या मिनिटाला) यांनी केले. हरमनप्रीतने १९ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केला.
मलेशिया संघाकडून रझी रहीम याने ५० व्या आणि रमदान रोस्ली याने ५९ व्या मिनिटाला गोल केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत मलेशियाचे रेकॉर्ड खूप प्रभावी होते. त्यांनी आतापर्यंत सर्वच सामने जिंकले असून, हा त्यांचा पहिला पराभव ठरला. दुसरीकडे भारतीय संघाने आजच्या विजयाच्या बळावर मलेशियाविरुद्ध हिशेब चुकता केला. याआधी भारताला अझलन शाह चषकात ०-१ आणि लंडन
येथील हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनल्समध्ये २-३ अशा पराभवाला सामोरे जावे लागले होते. या विजयामुळे भारतीय संघ सुपर ४ स्टेजमध्ये अव्वल स्थानी आला आहे. याआधी काल भारताने कोरियाला १-१ असे बरोबरीत रोखले होते. तत्पूर्वी, अन्य लढतीत कोरिया आणि पाकिस्तान यांच्यातील लढत १-१ गोलने बरोबरीत सुटली. आज मात्र, भारत विजय मिळवण्याच्या वज्र निर्धाराने खेळला. कर्णधार मनप्रीतसिंग याने दिलेल्या सुरेख पासवर आकाशदीपसिंगने १५ व्या मिनिटाला शक्तिशाली शॉट मारताना भारतीय संघाच्या गोलचे खाते उघडले. त्यानंतर हरमनप्रीतने १९ व्या भारताची आघाडी २-० अशी दुप्पट केली. भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत शक्तिशाली फ्लिकद्वारे गोलमध्ये रूपांतर केले. (वृत्तसंस्था)
२४ व्या मिनिटाला एस. के. उथप्पा याने तिसरा गोल करीत भारताला महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. त्यानंतर उथप्पा, ललित आणि आकाशदीप यांच्या साथीने गुरजंतसिंगने भारताला ४-० आणि सुनीलने ५-० अशी भारताची स्थिती आणखी भक्कम केली.
दरम्यान मलेशियाला आठ पेनल्टी कॉर्नर मिळाले; परंतु त्यांना फक्त एकाच पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करता आले. त्यांच्या रझी याने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले. त्यानंतर भारताचा सहावा गोल कर्णधार सरदारसिंग याने आकाशदीपच्या साथीने करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
04 या विजयासह भारताने सुपर फोरमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. दोन लढतीत भारताचे चार गुण झाले.
05भारताच्या आक्रमक धोरणामुळे तिसºया क्वार्टरनंतर मलेशियाविरोधात पाच गोलची नोंद केली.
सुपर फोरमध्ये भारताचा पुढचा सामना शनिवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत होणार आहे.
नियमानुसार अग्रक्रमांकावर असलेले दोन संघ अंतिम सामना खेळतील व ३ व ४ क्रमांकाचे संघ तिस-या क्रमांकासाठी रविवारी खेळतील.
या विजयाने भारताने अझलन शाह हॉकी स्पर्धा आणि वर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेतील पराभवाचा वचपा काढला.