एफआयएच सिरीज हॉकी :भारतीय महिला अंतिम फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 05:03 AM2019-06-23T05:03:34+5:302019-06-23T05:03:53+5:30
ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
हिरोशिमा : ड्रॅग फ्लिकर गुरजीत कौरच्या दोन गोलमुळे भारतीय महिला हॉकी संघाने शनिवारी एफआयएच सिरीज फायनल्सच्या उपांत्य लढतीत चिलीचा ४-२ असा पराभव करीत अंतिम फेरी गाठली. या विजयासह भारताने टोकियो आॅलिम्पिक पात्रतेची देखील अंतिम फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील आघाडीचे दोन्ही संघ यंदा २०२० आॅलिम्पिकच्या अंतिम पात्रता फेरीत खेळणार आहेत. गुरजीत कौरने २० आणि २२ व्या मिनिटाला तसेच नवनीत कौरने ३१ व्या आणि कर्णधार राणी रामपालने ५७ व्या मिनिटाला गोल केला. चिलीकडून कॅरोलिना गार्सियाने १८ व्या तसेच मॅन्यूएला उरोजने ४३ व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदविला. भारतीय संघ आता जपानविरुद्ध खेळणार आहे.
यजमान जपानने दुसऱ्या उपांत्य सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये रशियावर ३-१ ने विजय साजरा केला. उभय संघ निर्धारित ६० मिनिटात १-१ ने बरोबरीत होते. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानी असलेल्या भारताने पहिल्या १५ मिनिटात प्रतिस्पर्धी संघांवर सहावेळा हल्ले केले पण त्याचा काहीही लाभ झाला नाही. चिली संघाने देखील चारवेळा भारताच्या गोलफळीवर हल्ला केला पण त्यांनाही लाभ होऊ न शकल्याने पहिल्या क्वॉर्टरमध्ये गोल होऊ शकला नव्हता.
दुसºया क्वॉर्टरच्या तिसºया मिनिटाला चिलीकडून कॅरोलिनाने गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. या गोलमुळे आश्चर्यचकित झालेल्या भारतीय खेळाडूंनी २२ व्या मिनिटाला बरोबरी साधली. गुरजीतने हा गोल केला. सहा मिनिटानंतर नवनीतने आणखी एक गोल नोंदवून आघाडी मिळवून दिली. सहा मिनिटांचा खेळ होत नाही तोच गुरजीतने पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून आघाडी ३-१ अशी केली.
चिली संघाने देखील दोनदा पेनल्टी कॉर्नरची संधी मिळविली पण त्याचा त्यांना लाभ होऊ शकला नाही. मॅन्युएला उरोजने दुसरा गोल ४३ व्या मिनिटाला केला. भारताची कर्णधार राणी रामपाल हिने ५७ व्या मिनिटाला गोल नोंदविताच आघाडी ४-२ अशी झाली.
लालरेमसियानीच्या वडिलांना विजय समर्पित...
भारतीय संघाने हा विजय सहकारी खेळाडू लालरेमसियानी हिच्या वडिलांना समर्पित केला. त्यांचे शुक्रवारी निधन झाले. राणीने या युवा स्ट्रायकरची प्रशंसा केली. वडिलांच्या निधनानंतर मायदेशी न परतता लालरेमसियानी हिने संघासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. राणी म्हणाली, ‘लालरेमसियानी हिने आपले वडील गमावले. पण संघासोबत थांबण्याचा निर्णय घेतला. हा विजय त्यांना समर्पित आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. लालरेमसियानीचा खेळ अप्रतिम असून आम्हाला तिच्यावर गर्व आहे. अंतिम फेरी गाठल्याचा सर्व खेळाडूंना आनंद वाटतो.’