FIH Women's Hockey World Cup : भारतीय महिलांना आव्हान राखण्यात यश, अमेरिकेला बरोबरीत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 11:00 PM2018-07-29T23:00:02+5:302018-07-29T23:19:30+5:30

भारतीय संघाने महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला 1-1 अशा बरोबरीत रोखले.

FIH Women's Hockey World Cup: Indian women keep challenge alive, hold america | FIH Women's Hockey World Cup : भारतीय महिलांना आव्हान राखण्यात यश, अमेरिकेला बरोबरीत रोखले

FIH Women's Hockey World Cup : भारतीय महिलांना आव्हान राखण्यात यश, अमेरिकेला बरोबरीत रोखले

Next

लंडन - भारतीय संघाने महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेतील 'B' गटातील अखेरच्या साखळी सामन्यात अमेरिकेला 1-1 अशा बरोबरीत रोखले. या निकालासह भारतीय महिलांनी गोल सरासरीच्या जोरावर विश्वचषक स्पर्धेतील आव्हान कायम राखले. 

भारतीय महिलांनी सुरूवात तर आत्मविश्वासाने केली, परंतु त्यांना सातत्य राखण्यात अपयश आले. पहिल्या सत्रातील 20 मिनिटांत मिळालेल्या चार पेनल्टी कॉर्नरवर भारतीय महिलांना गोल करता आला नाही. आक्रमणपटू नवनीत कौर पेनल्टी कॉर्नरवरून चेंडू इतक्या संथ गतीने पास करत होती, की अमेरिकेच्या गोलरक्षक जॅकी ब्रिग्जला चेंडूचा अंदाज बांधण्यासाठी पुरेसा वेळ मिळत होता. पाय मुरगळल्यामुळे  तिस-याच मिनिटाला कर्णधार राणी रामपालला मैदान सोडावे लागले आणि त्यानंतर भारताच्या आक्रमणाची धार बोथट झाली.



 

11 व्या मिनिटाला पॉलिनो मार्गोक्सने मैदानी गोल करून अमेरिकेला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. 15 व्या मिनिटाला राणी मैदानावर परतली. मात्र, पिछाडीवर पडलेल्या भारतीय खेळाडूंना पुनरागमन करता आलेच नाही. 18 व्या मिनिटाला उदिताने चालून आलेली संधी गमावली. गोलपोस्ट समोर असलेल्या उदीताला केवळ चेंडूला दिशा द्यायची होती आणि तेही तिला करता आले नाही. पहिल्या सत्रातील भारतीय महिलांचा खेळ आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने साजेसा झालेला नाही. गोलरक्षक सविताने पुन्हा एकदा काही अप्रतिम बचाव केले.



आक्रमणातील ढिसाळपणा आणि समन्वयाचा अभाव यामुळे भारतीय खेळाडूंना पहिल्या सत्रात अनेक संधी मिळूनही गोल करता आलान नाही. अमेरिकेच्या खेळाडूंच्या तुलनेत भारतीय खेळाडू तंदुरूस्तीच्या बाबतीतही थकलेले जाणवत होते. मात्र दुस-या सत्रात भारतीय खेळाडू संपूर्ण ताकदीने खेळ केला. मध्यंतरानंतरच्या पहिल्याच मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर कर्णधार राणी रामपालने तेज तर्रार हिट लगावत भारताला बरोबरीचा गोल मिळवून दिला. 


आघाडी मिळवल्यानंतर बचावात्मक पवित्रा स्वीकारण्याचा अमेरिकेचा डाव फसला. भारतीय खेळाडूंनी अमेरिकेच्या D क्षेत्रात सातत्याने चढाई करून अमेरिकेच्या बचावपटूंना व्यग्र ठेवले. मध्यरक्षक मोनिका मलिकने आपली जबाबदारी चोख बजावली. तारा व्हिटेसेने बॅक फ्लिपवर गोल करण्याचा केलेला प्रयत्न सविताने सुरेख पद्धतीने अडवला. त्यामुळे 45 मिनिटांच्या खेळानंतर सामना 1-1 असा बरोबरीतच राहिला. 


अखेरच्या सत्रात पेनल्टी कॉर्नरवर राणीचा प्रयत्न यावेळी ब्रिग्जने अपयशी ठरवला. अखेरच्या सत्रात भारतीय महिलांकडून सातत्याने आक्रमणच झाले. 51व्या मिनिटाला निक्की प्रधानने आघाडीची संधी निर्माण केली, परंतु भारताला 1-1 अशा बरोबरीवरच समाधान मानावे लागले. 
 

Web Title: FIH Women's Hockey World Cup: Indian women keep challenge alive, hold america

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.