चौरंगी हॉकी स्पर्धा : भारत-जपान लढत आज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 03:17 AM2018-01-17T03:17:16+5:302018-01-17T03:17:29+5:30
भारतीय पुरुष हॉकी संघ चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत बुधवारी सलामी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. नव्या मोसमाची विजयाने सुरुवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.
तौरंगा (न्यूझीलंड) : भारतीय पुरुष हॉकी संघ चार देशांच्या निमंत्रित हॉकी स्पर्धेत बुधवारी सलामी लढतीत जपानविरुद्ध खेळणार आहे. नव्या मोसमाची विजयाने सुरुवात करण्यास भारतीय संघ उत्सुक आहे. भारतीय संघ पाच दिवसीय दोन वेगवेगळ्या मालिकांमध्ये बेल्जियम आणि न्यूझीलंड संघांसोबतही खेळणार आहे. येथे चार दिवस सराव केल्यानंतर ड्रॅग फ्लिकर रूपिंदर पाल सिंगने नव्या मोसमाची शानदार सुरुवातीची
आशा व्यक्त केली आहे. रूपिंदरपाल सिंग म्हणाला, ‘संघाचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आम्ही चांगला सराव केला असून, विजयी सुरुवातीची अपेक्षा आहे.’ रूपिंदर, बीरेंद्र लाकडा, सुरेंदर कुमार, हरमनप्रीत सिंग, वरुण कुमार, गुरिंदर सिंग बचाव फळीची जबाबदारी सांभाळणार आहेत. वर्षाची पहिली स्पर्धा असून लय गवसण्यासाठी विजयाने सुरुवात करणे आवश्यक आहे, असेही रूपिंदर म्हणाला.
आम्ही भुवनेश्वरमध्ये ओडिशा पुरुष हॉकी विश्व लीग फायनलमध्ये त्यांच्याविरुद्ध चांगली कामगिरी केली होती; पण आता कामगिरीत सातत्य राखावे लागेल. बचाव फळीची कामगिरी चांगली व्हायला हवी. श्रीजेशचे संघातील पुनरागमन चांगली बाब आहे. कारण बलाढ्य संघांविरुद्ध त्याचा अनुभव उपयुक्त ठरेल.
- रूपिंदर पाल सिंग