मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 01:42 AM2018-12-10T01:42:40+5:302018-12-10T01:42:43+5:30

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनीने विजयी घोडदौड कायम राखताना रविवारी चुरशीच्या लढतीत मलेशियाचा ५-३ ने पराभव केला.

Germany defeated Malaysia 5-3 to reach quarter-finals | मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश

मलेशियाचा ५-३ ने पराभव करत जर्मनीने निश्चित केला उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश

Next

भुवनेश्वर : ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या जर्मनीने विजयी घोडदौड कायम राखताना रविवारी चुरशीच्या लढतीत मलेशियाचा ५-३ ने पराभव केला. यासह ‘ड’ गटात अव्वल स्थान पटकावलेल्या जर्मनीने हॉकी विश्वचषक स्पर्धेमध्ये थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला.
जर्मनीने गटातील तिन्ही सामने जिंकत ९ गुणांची कमाई केली. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असलेल्या जर्मनीतर्फे टीम हर्जब्रुचने दुसऱ्या व ५९ व्या मिनिटाला आणि ख्रिस्टोफर रुहरने १४ व १८ व्या मिनिटाला गोल नोंदविले. त्याचप्रमाणे मार्को मिल्टकाऊने ३९ व्या मिनिटाला गोल केला. मलेशियातर्फे तिन्ही गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवले गेले. त्यात राजी रहीमने २६ व ४२ व्या मिनिटाला दोन तर नबील नूरने २८ व्या मिनिटाला एक गोल केला. या निकालासह जर्मनी संघ दोनदा जेतेपद पटकावणारा ऑस्ट्रेलिया, ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना आणि यजमान भारत यांच्यासह उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाला.

आशियाई क्रीडा स्पर्धेमधील रौप्यपदक विजेता मलेशिया संघ ‘ड’ गटात केवळ एका गुणासह सुमार गोलसरासरीच्या आधारावर सध्या अखेरच्या स्थानी आहे. उभय संघांना या लढतीत गोल करण्याच्या अनेक संधी मिळाल्या; पण जर्मनी संघाने गोल करण्यात बाजी मारली. जर्मनीने हर्जब्रुच व रुहर यांच्या कामगिरीच्या जोरावर १८ व्या मिनिटाला ३-० अशी आघाडी घेतली होती. पण, मलेशिया संघाने शानदार पुनरागमन केले. २८ व्या मिनिटाला रहीम व नूर यांनी नोंदविलेल्या गोलच्या जोरावर २-३ अशी पिछाडी भरून काढली. जर्मनी संघाने मलेशियाच्या कमकुवत बचावाचा लाभ घेतला. मिल्टकाऊने ३९ व्या मिनिटाला निकलस वालेनच्या पासवर गोल नोंदवला. मलेशियाने रहीमच्या गोलच्या जोरावर अंतर ३-४ असे केले. शेवटी जर्मनीने वर्चस्व कायम राखताना मिल्टकाऊने अखेरच्या मिनिटाला गोल नोंदविल्यामुळे मलेशियाच्या पुनरागमन करण्याच्या आशा मावळल्या. मलेशियाला या लढतीत ८ पेनल्टी कॉर्नर तर जर्मनीला ७ पेनल्टी कॉर्नर मिळाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Germany defeated Malaysia 5-3 to reach quarter-finals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.