विश्व हॉकी लीग स्पर्धेत जर्मनीचे आज भारताला आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 01:50 AM2017-12-04T01:50:47+5:302017-12-04T01:51:08+5:30
विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील
भुवनेश्वर : विश्व हॉकी लीग स्पर्धेत सोमवारी (दि. ४) भारताचा सामना रिओ आॅलिम्पिक कांस्यपदकप्राप्त जर्मनीविरुद्ध होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या नजरा आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याकडे असतील. भारतीय संघाने पहिल्या सामन्यात शानदार प्रदर्शन केले होते. दुसºया सामन्यात मात्र त्यांनी निराशा केली.
एका सामन्यात चांगली, तर दुसºया सामन्यात निराशाजनक अशीच कामगिरी गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यामुळे भारतीय संघ लय प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. सुरुवातीच्या सामन्यात आॅस्ट्रेलिया संघाला १-१ अशा बरोबरीवर रोखण्यात यश मिळवले होते. या निकालानंतर भारतीय संघ ‘ब’ गटात एका गुणासह शेवटच्या स्थानावर आहे. जर्मनीचा संघ एक विजय आणि एका ड्रॉसह ४ गुण मिळवत अव्वल स्थानावर आहे. सहाव्या मानांकनावर असणारा भारतीय संघ विश्व मानांकनात जर्मनीच्या केवळ एका स्थानाने मागे आहे. या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर भारतीय संघाला सर्वाेत्कृष्ट प्रदर्शन करावे लागणार आहे. इंग्लंडकडून पराभूत झाल्यानंतर सोर्ड मारिने म्हणाला, की आम्हाला लय प्राप्त करण्याची गरज आहे. संघाचा स्तर का घसरला, हा मोठा प्रश्न आहे. याविषयी चर्चा करणे गरजेचे आहे.