गोलकीपर श्रीजेशचे पुनरागमन, हॉकी इंडियाकडून राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची नावे जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2018 01:00 AM2018-01-04T01:00:48+5:302018-01-04T01:01:03+5:30
हॉकी इंडियाने आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याचा समावेश करण्यात आला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आठ महिने बाहेर राहिलेल्या श्रीजेशपुढे फॉर्ममध्ये येण्याचे आव्हान असेल.
बंगळुरू - हॉकी इंडियाने आज गुरुवारपासून सुरू होत असलेल्या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय शिबिरासाठी ३३ खेळाडूंची यादी जाहीर केली असून, त्यात अनुभवी गोलकीपर पी. आर. श्रीजेश याचा समावेश करण्यात आला. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आठ महिने बाहेर राहिलेल्या श्रीजेशपुढे फॉर्ममध्ये येण्याचे आव्हान असेल. मागच्या वर्षी अझलान शाह हॉकी स्पर्धेदरम्यान तो जखमी झाला होता.
ओडिशा येथे झालेल्या विश्व हॉकी लीगमध्ये कांस्य जिंकून वर्षाला निरोप देणाºया भारतीय संघाचे नव्या वर्षात पहिले १० दिवसांचे शिबिर साई केंद्रात सुरू होत आहे. शिबिरासाठी २०१६ चा ज्युनियर विश्वचषक विजेत्या संघाचा गोलकीपर कृष्णा पाठक याला आकाश चिकटे आणि सूरज करकेरा यांच्यासोबत संधी देण्यात आली. सूरजने विश्व लीगदरम्यान प्रभावित केले होते. आशिया चषक विजेतेपदात प्रभावी कामगिरी करणारा ओडिशाच्या सुंदरगड येथील युवा खेळाडू नीलम संजीव यालादेखील स्थान देण्यात आले.
सरदारसिंग, हरमनप्रीत, अमित रोहिदास, दीप्सन तिर्की, वरुण कुमार, रूपिंदरपालसिंग, वीरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार आणि गुरिंदरसिंग यांना बचाव फळीसाठी निवडण्यात आले. मधल्या फळीत खेळणाºयांच्या यादीत
बदल झालेले नाहीत. मनप्रीतसिंग, चिंगलेनसना सिंग, एस. के. उथप्पा, कोथाजितसिंग, सतबीरसिंग, नीलकांत शर्मा, सिमरनजितसिंग आणि हरजितूसिंग यांचे स्थान कायम आहे.
फॉरवर्ड सुमित कुमार याच्यासह एस. व्ही. सुनील, आकाशदीपसिंग, मनदीप सिंग, ललित उपाध्याय, गुरजंत सिंग, रमणदीप सिंग, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ आणि तलविंदरसिंग हे आघाडीच्या फळीत आहेत.
यंदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे आयोजन गोल्ड कोस्ट येथील चॅम्पियन्स ट्रॉफी नेदरलँड येथे, आशियाड जकार्ता येथे आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी भुवनेश्वर येथे होणार आहे.
मुख्य कोच मारिन शोर्ड म्हणाले, ‘न्यूझीलंडमध्ये आठ सामने खेळायचे आहेत. त्यादृष्टीने लहान शिबिराची आखणी करण्यात आली आहे. स्थानिक सामने खेळणाºया खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.’
शिबिरासाठी निवडले गेलेले खेळाडू
गोलकीपर : आकाश चिकटे, सूरज करकेरा, पीआर श्रीजेश आणि कृष्ण बी पाठक.
बचाव फळी : सरदारसिंग, हरमनप्रीतसिंग, अमित रोहिदास, दीप्सन तिर्की, वरुण कुमार, रूपिंदरपालसिंग, वीरेंद्र लाक्रा, सुरेंदर कुमार, गुरिंदरसिंग आणि नीलम संजीव.
मिडफिल्डर : मनप्रीतसिंग, चिंंगलेनसना सिंग, एस. के. उथप्पा, सुमित, कोथाजितसिंग, सतबीरसिंग, नीलकांत शर्मा, सिमरनजितसिंग आणि हरजितसिंग.
फॉरवर्ड : सुमित कुमार, एस. व्ही. सुनील, आकाशदीपसिंग, मनदीपसिंग, ललित उपाध्याय, गुरजंतसिंग, रमणदीपसिंग, अरमान कुरेशी, अफ्फान युसूफ आणि तलविंदरसिंग.