नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज, हरेंद्रसिंग म्हणतात मी सर्वोत्कृष्ट पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 12:24 AM2017-09-06T00:24:40+5:302017-09-06T00:25:33+5:30
हकालपट्टी करण्यात आलेले सिनियर पुरुष हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांचे स्थान घेण्यास मी सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचा दावा विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्रसिंग यांनी केला आहे.
नवी दिल्ली : हकालपट्टी करण्यात आलेले सिनियर पुरुष हॉकी संघाचे कोच रोलॅन्ट ओल्टमन्स यांचे स्थान घेण्यास मी सर्वोत्कृष्ट पर्याय असल्याचा दावा विश्वचषक विजेत्या ज्युनियर हॉकी संघाचे कोच हरेंद्रसिंग यांनी केला आहे. या भूमिकेसाठी आपण ‘फिट’ असल्याचे मत व्यक्त करीत त्यांनी अर्ज भरण्याची तयारी केली आहे.
२००९ ते २०११ या कालावधीत सिनियर पुरुष संघाचे कोच राहिलेले हरेंद्रसिंग यांनी आपण विदेशी प्रशिक्षकाच्या तुलनेत तसुभरही कमी नसल्याचा देखील दावा केला. हॉकी इंडिया माझ्या अर्जाकडे डोळेझाक करू शकणार नाही, असेही ते म्हणाले.
‘होय मी निश्चितपणे अर्ज करणार आहे. पूर्ण तयारीनिशी अर्ज सोपविणार असून देशवासीयांच्या अपेक्षांची पूर्तता करण्याचे वचन देतो. माझ्याकडे कोचिंगचा २१ वर्षांचा अनुभव आहे. २०२० चे प्लॅनिंगदेखील सादर करणार आहे. मी देशभक्त असल्याने स्पर्धेत पदक जिंकणे हेच लक्ष्य असते, असे हरेंद्र यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
विदेशी कोचला येथील परिस्थिती आणि खेळाडूची माहिती नसल्याने शून्यापासून सुरुवात करावी लागेल. मी या खेळाडूंना चांगल्या तºहेने ओळखतो, असे हरेंद्र यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
कोचचे पद मिळण्याबाबत आपण किती आश्वस्त आहात, असा सवाल करताच हरेंद्र म्हणाले,‘हॉकी इंडिया आता माझ्याकडे डोळेझाक करू शकणार नाही. आघाडीच्या कोचेसमध्ये माझे नाव असल्याने मी रिकी चाल्सवर्थ यांचा अपवाद वगळता अन्य कुठल्याही विदेशी कोचच्या हाताखाली काम करणार नाही, हे देखील स्पष्ट करू इच्छितो. ज्युनियर विश्वचषक विजेत्या कोचने अर्ज केल्यास दावेदार असेल असे संकेत हाय परफॉर्मन्स संचालक डेव्हिड जॉन यांनी दिल्यामुळे हरेंद्र हेच मुख्य कोच बनण्याची शक्यता बळावली आहे.(वृत्तसंस्था)
नव्या कोचसाठी हॉकी इंडियाने मागविले अर्ज
४रोलॅन्ट ओल्टमन्स यांच्या हकालपट्टीनंतर हॉकी इंडियाने भारतीय पुरुष हॉकी संघासाठी नव्या कोचचा शोध सुरू केला आहे. स्वत:च्या वेबसाईटवर हॉकी इंडियाने इच्छुकांकडून अर्ज मागविले आहेत. बीसीसीआयच्या धर्तीवर हॉकी इंडियाने प्रथम जाहिरात दिली.जाहिरातीनुसार मुख्य कोचची नियुक्ती २०२० च्या टोकियो आलिम्पिकपर्यंत असेल. कोचचे काम समाधानकारक आहे की नाही हे तपासण्यासाठी सहा महिन्यांचा परिविक्षाधिन(प्रोबेशन) कालावधी दिला जाईल. मुख्य कोच हा हॉकी इंडियाचे हाय परफॉमर्न्स संचालक डेव्हिड जॉन, सीईओ अॅलेना नॉर्मन आणि भारतीय क्रीडा प्राधिकरणाला (साई)जबाबदार असेल. २०१८ ला आॅलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन होणार असून या स्पर्धेतील संघाच्या कामगिरीची जबाबदारीदेखील नव्या कोचवरच असेल. मुख्य कोच हा ज्युनियर संघाचा विकास आणि तयारीवर लक्ष ठेवणार आहे. संघ व्यवस्थापनाकडे प्रगती अहवाल नियमितपणे सादर करावा लागेल. जाहिरातीनुसार इच्छुकांकडे आंतरराष्टÑीय महासंघाच्या हाय परफॉमर्न्स कोचिंगमधील लेव्हल-३ असायला हवे शिवाय आंतरराष्टÑीय स्तरावर त्याची कामगिरी उच्चस्तरीय असायला हवी. अन्य आंतरराष्टÑीय संघांबाबत माहिती कोचला असायला हवी. खेळाडू, कोचेस आणि स्टाफ यांना सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरणा देण्याची गुणवत्ता त्याच्या व्यक्तिमत्त्वात असायला हवी. योग्य उमेदवाराने स्वत:चा अर्ज ई मेलद्वारे १५ सप्टेंबरपर्यंत हॉकी इंडियाच्या सीईओकडे द्यायचा आहे.