ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या भारताच्या पुरुष व महिला हॉकी संघांची राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:46 PM2021-10-05T19:46:36+5:302021-10-05T19:47:12+5:30
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघानं कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. महिला हॉकी संघानंही चौथे स्थान पटकावून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली
टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघानं कांस्यपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. ४१ वर्षांनंतर भारतीय पुरुष हॉकी संघानं ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले. महिला हॉकी संघानंही चौथे स्थान पटकावून आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा हॉकीच्या सुवर्णयुगाला सुरुवात होईल, अशी आशा दिसू लागलीय. त्यामुळे आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष व महिला संघाची कामगिरी कशी होते, याची सर्वांनाच उत्सुकता होती. पण, पुढल्या वर्षी बर्मिंगहॅम येथे होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून हॉकी संघांनी माघार घेतली आहे.
भारतीय पुरुष व महिला हॉकी संघानं २०२२साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. ब्रिटनमधील कोरोना नियमांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. ब्रिटनच्या नियमानुसार प्रवाशांना १० दिवस क्वारंटाईन व्हावं लागतं आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेल्याचे हॉकी इंडियानं स्पष्ट केले. कोरोनाचे संकट अद्याप सरलेलं नाही आणि गेल्या १८ महिन्यांत इंग्लंडची अवस्था बिकट झालेली होती. २८ जुलै त ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत बर्मिंगहॅम येथे राष्ट्रकुल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आणि त्यानंतर १० ते २५ सप्टेंबरल २०२२ या कालावधीत चीनमध्ये आशियाई स्पर्धा होणार आहे. या दोन स्पर्धांमध्ये केवळ ३२ दिवसांचा कालावधी खेळाडूंना मिळतोय.
२०२४साली पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेची पात्रता निश्चित करण्याच्या दृष्टीनं आशियाई स्पर्धा महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रकुल स्पर्धेत सहभाग घेऊन आम्ही आमच्या खेळाडूंबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. त्यामुळेच राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुष व महिला संघाला न पाठवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, असे हॉकी इंडियानं स्पष्ट केले.