वर्चस्वाच्या लढाईसाठी हॉकी संघ सज्ज, विश्व हॉकी लीग आजपासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 01:16 AM2017-12-01T01:16:57+5:302017-12-01T01:18:02+5:30
आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे.
भुवनेश्वर : आशियाई हॉकीचा बादशहा भारतीय संघ आज शुक्रवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व हॉकी लीगच्या तिसºया आणि अखेरच्या टप्प्यात जागतिक स्तरावर वर्चस्वाच्या इराद्याने उतरणार आहे. ब गटात भारताची सलामीला गाठ पडेल ती मागील विजेता, विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलियाविरुद्ध.
भारताने अलीकडे ढाका येथे आशिया चषक जिंकला. आठवेळा आॅलिम्पिक विजेता असलेल्या भारताला या स्पर्धेच्या निमित्ताने आशिया बाहेरही आम्ही दमदार आहोत, हे दाखविण्याची संधी असेल.
आॅस्ट्रेलियाविरुद्ध भारताला यश मिळविता आले नाही. चॅम्पियन्स ट्रॉफी, अझलान शाह चषक आणि राष्टÑकुल स्पर्धेत पराभवाची निराशा पदरी पडली होती. यानिमित्ताने दोन महिन्यांआधी रोलॅन्ड ओल्टमन्स यांच्याकडून जबाबदारी स्वीकारणारे नवे कोच शोर्ड मारिन यांचीदेखील ही पहिली परीक्षा ठरेल. कुठल्या शैलीत खेळावे हे ठरविण्याची त्यांनी खेळाडूंना मुभा दिली आहे.
२०१५ मध्ये रायपूर येथे झालेल्या विश्व हॉकी लीगमध्ये भारताने कांस्य जिंकले होते. यंदा नमप्रीतसिंगच्या नेतृत्वात युवा आणि अनुभवी खेळाडूंचे मिश्रण असून हरमनप्रीत सिंग, सुमित, दीप्सन तिर्की, गुरजंतसिंग आणि वरुण कुमार हे युवा खेळाडू आहेत. रूपिंदरपाल सिंग आणि वीरेंद्र लाक्रा आणि अमित रोहिदास हे भक्कम बचाव करतील.
ब गटात भारत आणि आॅस्ट्रेलियाशिवाय इंग्लंड आणि जर्मनी यांचा समावेश आहे. अ गटात आॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिना, नेदरलँड, बेल्जियम आणि स्पेन हे संघ आहेत. (वृत्तसंस्था)
चक दे...
भारतीय खेळाडूंनी गुरुवारी कसून सराव केला. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या भारतीयांपुढे कामगिरीत सातत्य राखण्याचे मुख्य आव्हान असेल.