Hockey World Cup 2018 : ऑस्ट्रेलियाला कांस्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 08:36 PM2018-12-16T20:36:58+5:302018-12-16T22:29:09+5:30
विश्वचषक हॉकी स्पर्धा : इंग्लंड पराभूत; टॉम क्रेगची हॅट्ट्रिक
भुवनेश्वर: टॉम क्रेगने केलेल्या हॅटट्रिकच्या जोरावर येथे सुरु असलेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत रविवारी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर ८-१ असा दणदणीत विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. बॅरी मिडल्टनने इंग्लंडकडून एकमेव गोल नोंदवला. स्पर्धेच्या इतिहासातील आॅस्ट्रेलियाचे हे पाचवे कांस्यपदक आहे.
उपांत्यफेरीत नेदरलंडकडून पेनल्टी शूटआऊटवर झालेल्या पराभव विसरुन आॅस्ट्रेलियाचा संघ विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरला होता. तीन वेळा चॅम्पियन असलेल्या आॅस्ट्रेलियाने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. पहिल्या क्वॉर्टरमध्येच दोन गोलची आघाडी घेतल्याने इंग्लंडचे खेळाडू दबावाखाली आले.
आॅस्ट्रेलियाकडून टॉम क्रेगने सामन्याच्या ९ व्या, १९ व्या व ३४ व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक साधली. ब्लेक गोव्हर्सने आठव्या मिनिटाला गोल करत आॅस्ट्रेलियाला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली. ट्रेंट मिटन याने ३२ व्या मिनिटाला गोल करत संघाला ४-० अशी भक्कम आघाडी साधून दिली. त्यानंतर लगेच दोन मिनिटात दोन गोल करत आॅस्ट्रेलियाने विजयावर शिक्कामोर्तब केले. टिम ब्रॉँड व क्रेग यांनी हे गोल केले.
इंग्लंडकडून एकमात्र गोल बॅरी मिडल्टन याने तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये केला. शेवटच्या तीन मिनिटात मिळालेल्या दोन पेनल्टी कॉर्नवर आॅस्ट्रेलियाच्या जरेमी हॅवर्ड याने गोल करत ८-१ असा मोठा विजय मिळवून दिला. टॉम क्रेग याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
मागील दोन्ही विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडला चौथ्या स्थानी समाधाना मानावे लागले होते. इंग्लंडने १९८६ मध्ये सर्वश्रेष्ठ प्रदर्शन करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.