Hockey World Cup 2018 : बेल्जियमची अंतिम फेरीत धडक; इंग्लंडचा दारुण पराभव 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 05:42 PM2018-12-15T17:42:24+5:302018-12-15T17:42:43+5:30

बेल्जियमने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला 6-0 असे पराभूत केले.

Hockey World Cup 2018: Belgium in Finals; England's heavy defeat | Hockey World Cup 2018 : बेल्जियमची अंतिम फेरीत धडक; इंग्लंडचा दारुण पराभव 

Hockey World Cup 2018 : बेल्जियमची अंतिम फेरीत धडक; इंग्लंडचा दारुण पराभव 

Next

भुवनेश्वर, पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धा : बेल्जियमने पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडला 6-0 असे पराभूत केले. बेल्जियमने प्रथमच विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे, तर इंग्लंडला सलग तिसऱ्या विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत गाशा गुंडाळावा लागला. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या आर्जेन्टिनाला नमवून उपांत्य फेरीत धडकणाऱ्या इंग्लंडकडून अपेक्षित खेळ झाला नाही. 


भारतीय संघाने साखळी गटात झुंजवलेल्या बेल्जियमने उपांत्य फेरीच्या सामन्यात सरस खेळ केला. साखळी गटातील चुका टाळताना त्यांनी सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्याचे फळ त्यांना त्वरित मिळाले. सामन्याच्या पाचव्या मिनिटाला उत्तम समन्वयाचा खेळ करताना टॉम बून याने पाचव्या मिनिटाला बेल्जियमचे खाते उघडले. या गोलने मनोबल उंचावलेल्या बेल्जियमने सातत्याने इंग्लंडच्या सर्कलवर आक्रमण सुरूच ठेवले. क्रॉसओव्हर सामन्यात जर्मनीला नमवून बेल्जियमचा आत्मविश्वास वाढला होता. त्यांच्या खेळातून याची प्रचिती येत होती. 19 व्या मिनिटाला सिमोन गोनगार्डने अप्रतिम मैदानी गोल करताना बेल्जियमला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या सत्रात ही आघाडी कायम राखत बेल्जियमने वर्चस्व गाजवले.


या लढतीसाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणारा कुस्तीपटू सुशील कुमार हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित होता. सुशीलने 2008 आणि 2012 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत अनुक्रमे कांस्य व रौप्यपदक जिंकले आहे.


मध्यंतरानंतर बेल्जियमच्या आक्रमणाची धार अधिक तीव्र झाली. सेड्रिक चार्लीएर आणि ॲलेक्झांडर हेंड्रिक्स यांनी अनुक्रमे 42 व 45 व्या मिनिटाला गोल करताना बेल्जियमची आघाडी 4-0 अशी भक्कम केली. तिसऱ्या सत्रातच बेल्जियमने विजय पक्का केला होता.


अखेरच्या 15 मिनिटांत इंग्लंडकडून अपेक्षित असलेला कडवा संघर्ष पाहायला मिळाला नाही. 50 व्या मिनिटाला हेंड्रिक्सने आणखी एक गोल करताच इंग्लंडने पराभव मान्य केला. तीन मिनिटांनी सेबॅस्टीयन डॉकीयने अव्वल गोल करताना इंग्लंडच्या बचावफळीच्या मर्यादा स्पष्ट केल्या. बेल्जियमने 6-0 अशा फरकाने विजय मिळवला.

Web Title: Hockey World Cup 2018: Belgium in Finals; England's heavy defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.