Hockey World Cup 2018 : भारताच्या विजयात जुळून आला योगायोग; वाटेल वर्ल्ड कप आपलाच
By स्वदेश घाणेकर | Published: November 28, 2018 08:47 PM2018-11-28T20:47:47+5:302018-11-28T20:49:06+5:30
४३ वर्षांचा विश्वचषक स्पर्धेचा दुष्काळ तुम्ही संपवाल हा विश्वास प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसत होता. भारतीय खेळाडूंनीही तो सार्थ ठरवत पहिल्याच सामन्यात दणका उडवला.
स्वदेश घाणेकर, हॉकी विश्वचषक स्पर्धा: ओडिशाच्या कलिंगा स्टेडियमवर पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या निमित्ताने उत्सवालाच सुरुवात झाली होती. खचाखच भरलेले स्टेडियम, तिकिटांसाठी झालेली हाणामारी आणि रस्त्याच्या दुतर्फा भारतीय खेळाडूंना चिअर करण्यासाठी झालेली गर्दी, बरेच काही सांगणारी होती. ४३ वर्षांचा विश्वचषक स्पर्धेचा दुष्काळ तुम्ही संपवाल हा विश्वास प्रत्येकाच्या डोळ्यांत दिसत होता. भारतीय खेळाडूंनीही तो सार्थ ठरवत पहिल्याच सामन्यात दणका उडवला. या सामन्यात मनदीप सिंगच्या निमित्ताने एक योगायोग जुळून आला आणि भारतीयांना वाटू लागले हा वर्ल्ड कप आपलाच..
युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या या संघात ज्युनियर वर्ल्ड कप उंचावणाऱ्या संघातील सात खेळाडू होते. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. हरमनप्रीत सिंह, वरुण कुमार, सुमित, मनदीप सिंग यांनी आपली निवड पहिल्याच सामन्यात सार्थ ठरवली. मनदीपने पहिला गोल करून संघाला आघाडीही मिळवून दिली आणि हाच तो योगायोग.
भारताच्या ज्युनियर संघाने 2016 मध्ये वर्ल्ड कप जिंकला होता. सध्या सीनियर संघाचे प्रशिक्षक हरेंदर पाल सिंग हे त्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानी ज्युनियर गटातील वर्ल्ड कप जेतेपदाचा दुष्काळ संपविला होता. या स्पर्धेत भारताने कॅनडाला नमवत विजयाचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर भारतीय संघाने एकेक विजय मिळवून जेतेपद पटकावले होते. 2001 नंतर भारताने जिंकलेला हा पहिला ज्युनियर वर्ल्ड कप होता.
भारताचा तो पंधरा वर्षांचा दुष्काळ संपवण्याचा पाया मनदीप सिंगने घातला होता. ज्युनियर वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात पहिला गोल मनदीपने केला होता. पंजाबच्या याच मनदीपने बुधवारी सिनियर संघाच्या विजयाचा पाया घातला. त्यानेच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात पहिला गोल केला. त्यानंतर भारताने दणदणीत विजयासह स्पर्धेची सुरुवात केली. मनदीपच्या या योगायोगने हाही वर्ल्ड कप आपण जिंकू असा विश्वास वाढला आहे.