Hockey World Cup 2018: ऑस्ट्रेलियासमोर नेदरलँड्सचे आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 04:39 AM2018-12-15T04:39:37+5:302018-12-15T04:39:57+5:30
विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून ऑस्ट्रेलियन संघ फक्त दोन विजय दूर
भुवनेश्वर : विजेतेपदाची हॅट्ट्रिक नोंदवण्यापासून ऑस्ट्रेलियन संघ फक्त दोन विजय दूर आहे. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाला नेदरलँड्सच्या आक्रमक आव्हानाला सामोरे जावे लागेल. तर दुसरीकडे, इंग्लंडचा सामना बेल्जियमविरुद्ध होणार आहे. विजेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या तीन वेळच्या विजेत्या आॅस्ट्रेलिया संघाने या स्पर्धेत आपले कडवे आव्हान ठेवले आहे.
नेदरलँड्सने कलिंगा स्टेडियमवर सुमारे १८ हजार प्रेक्षकांसमोर शानदार फॉर्ममध्ये असलेल्या भारतीय संघाला पराभूत केले. प्रशिक्षक मॅक्स कॅलडस यांनी सांगितले की, ‘आमच्याकडे मोठे सामने जिंकण्याचा अनुभव आहे. भारताविरुद्धचा विजय महत्त्वपूर्ण होता. हा अडथळा पार केल्यानंतर आम्ही आॅस्ट्रेलियाच्या आव्हानालाही पार करु. खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. सलग सामने खेळल्याने प्रदर्शनावर फारसा फरक पडत नाही.’
आॅस्ट्रेलियाही नेदरलँड्सविरुद्ध निष्काळजीपणा घेणार नाही. गेल्या विश्वचषक अंतिम सामन्यात त्यांनी नेदरलँड्सलाच पराभूत केले होते. आॅस्ट्रेलियाचे डॅनी बिल म्हणाले की, ‘आम्हाला माहीत आहे की डच संघ किती धोकादायक आहे. आम्ही भारताविरुद्धचा त्यांचा सामना पाहिला. त्यांना पकड बनवण्याची कोणतीही संधी आम्ही देणार नाही. आम्ही आक्रमक हॉकी खेळू.’ दुसऱ्या उपांत्य फेरीत इंग्लंडच् बेल्जियमविरुद्ध लढेल. बेल्जियमचा संघ गेल्या काही काळापासून हॉकीत ताकदवान संघ म्हणून समोर आला आहे. मात्र त्यांच्याकडे कोणत्याही मोठ्या स्पर्धेचे जेतेपद नाही.