हॉकी विश्वचषक: आॅस्ट्रेलिया उपांत्यपूर्व फेरीत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 04:21 AM2018-12-05T04:21:58+5:302018-12-05T04:22:03+5:30
गतविजेत्या आॅस्ट्रेलिया संघाने इंग्लंड संघाचा ३-० गोलने पराभव करून हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली.
भुवनेश्वर : गतविजेत्या आॅस्ट्रेलिया संघाने इंग्लंड संघाचा ३-० गोलने पराभव करून हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. दुसरीकडे चीन संघाने आयर्लंड संघाला १-१- गोल बरोबरीत रोखले.
या विजयासह आॅस्ट्रेलियाने ब गटात सहा गुणांसह अग्रस्थान मिळवले आहे. मागील सामन्यात आॅस्ट्रेलियाने आयर्लंडला २-१ ने पराभूत केले होते. या पराभवामुळे इंग्लंडची चिंता वाढली आहे. इंग्लंडने चीनविरुद्धचा सामना २-२ असा बरोबरीत राखला होता. आॅस्ट्रेलिया आपला शेवटचा सामना सात डिसेंबरला चीनविरुद्ध, तर इंग्लंडचा सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे.
इंग्लंड व आॅस्ट्रेलिया सामन्याचा पूर्वार्ध खूपच संथ झाला. दोन्ही संघांकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. मात्र गोल करण्यात यश आले नाही. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला इंग्लंडला, तर २१ व्या मिनिटाला आॅस्ट्रेलियाला गोल करण्याची चांगली संधी मिळाली होती. मात्र यात यश मिळाले नाही. तिसऱ्या क्वार्टरमध्ये आॅस्ट्रेलियाला पेनल्टी कॉर्नर मिळाला मात्र यातही गोल करण्यात अपयश आले. सामन्याच्या शेवटच्या पंधरा मिनिटांत मात्र आॅस्ट्रेलियाने खेळाचा नूरच पालटवून टाकला.
आॅस्ट्रेलियाने चार मिनिटांत दोन गोल करीत २-० अशी आघाडी मिळवली. शेवटची चार मिनिटे शिल्लक असताना कोरे वेयेरने गोल करीत ३-० अशी विजयी आघाडी मिळवली.
चीन-आयर्लंड लढत बरोबरीत
चीन संघाने आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकाचे मानांकन असलेल्या आयर्लंड संघाला १-१ गोल बरोबरीत रोखले. चीन संघाला ४३ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जिन ग्यूने गोल करून आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. पण चीनच्या खेळाडूंना या गोलचा आनंद जास्त वेळ साजरा करता आला नाही. आयर्लंडच्या एलन साऊदर्नने ४४ व्या मिनिटाला गोल करून बरोबरी साधली.