हॉकी विश्वचषक : गतविजेत्या भारताचे आव्हान संपुष्टात, उपांत्य फेरीत जर्मनीकडून पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2021 06:17 AM2021-12-04T06:17:09+5:302021-12-04T06:17:37+5:30
Hockey World Cup: गतविजेत्या भारतीय हॉकी संघाला शुक्रवारी उपांत्य सामन्यात सहा वेळेचा चॅम्पियन जर्मनीकडून २-४ असा पराभव पत्करावा लागल्याने कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या ज्युनिअर विश्वचषकातील यजमान संघाचे आव्हान संपुष्टात आले.
भुवनेश्वर : गतविजेत्या भारतीयहॉकी संघाला शुक्रवारी उपांत्य सामन्यात सहा वेळेचा चॅम्पियन जर्मनीकडून २-४ असा पराभव पत्करावा लागल्याने कलिंगा स्टेडियमवर सुरू असलेल्या ज्युनिअर विश्वचषकातील यजमान संघाचे आव्हान संपुष्टात आले. विश्वचषषकाचा अंतिम सामना अर्जेंटिना आणि जर्मनी यांच्यात रंगणार आहे. दुसऱ्या उपांत्य सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पेनल्टी शूटआऊटमध्ये ३-१ ने पराभव केला.
पहिल्या क्वार्टरमध्ये जर्मनीने दुसऱ्या पेनल्टी कॉर्नरवर खाते उघडले. १५ व्या मिनिटाला एरिक क्लेईनलेईन याने हा गोल केला. यानंतर ॲरोन फ्लॅटेन (२१), कर्णधार हेन्स मुलेर (२४) आणि ख्रिस्टोफर कुटेर (२५) यांनी गोल केले. उत्तमसिंग याने भारताकडून २५ व्या मिनिटाला पहिला गोल केला. मध्यंतरापर्यंतच्या खेळात जर्मनीने भारतावर ४-१ अशी आघाडी संपादन केली होती. तिसऱ्या क्वार्टरमध्येही पाहुण्या खेळाडूंनी भारताला कोंडीत पकडले होते.
भारतीय खेळाडूंनीदेखील गोल नोंदविण्यासाठी वारंवार प्रयत्न केले पण बचाव फळी भेदण्यात मोक्याच्या क्षणी अपयश आले. अखेर चौथ्या क्वार्टरमध्ये बॉबीसिंग धामी याने ६० व्या मिनिटाला गोल करीत पराभवाचे अंतर कमी केले. बेल्जियमविरुद्धच्या सामन्यातील जोश भारतीय खेळाडूंमध्ये आज जाणवला नाही. भारतीय संघ आता फ्रान्सविरुद्ध तिसऱ्या स्थानासाठी रविवारी खेळणार आहे. याआधी सलामीला साखळी सामन्यात भारत फ्रान्सकडून ४-५ ने पराभूत झाला होता.