Hockey World Cup, IND vs ESP : भारताने विजयी सलामी दिली, स्पेनला पराभूत करून डरकाळी फोडली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 08:52 PM2023-01-13T20:52:26+5:302023-01-13T20:53:06+5:30
Hockey World Cup, India vs Spain : १९७५ नंतर पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात स्पेनवर दणदणीत विजय मिळवला.
Hockey World Cup, India vs Spain : १९७५ नंतर पुन्हा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धाराने मैदानावर उतरलेल्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्याच सामन्यात स्पेनवर २-० असा विजय मिळवला. १९७५ मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारताने एकमेव वर्ल्ड कप जिंकला होता. १९७१ मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड कप स्पर्धेत कांस्य आणि १९७३ मध्ये रौप्यपदक जिंकले होते. भुवनेश्वर येथे सुरू झालेल्या या वर्ल्ड कप स्पर्धेचा हा सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांनी स्टेडियम खचाखच भरले होते आणि भारतीय संघासाठी त्यांनी तेराव्या खेळाडूची भूमिका सक्षमपणे पार पाडली.
स्पेन आणि भारत यांच्यात वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ६ सामने झाले होते अन् स्पेनचे पारडे ३-२ असे वरचढ होते. एक सामना ड्रॉ राहिलेला. पण, एकंदर जय-पराजयाच्या आकडेवारीत भारत १३-११ असा आघाडीवर आहे. १२व्या मिनिटाला रोहिदास अमितने गोल करताना भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या कॉर्टरमधील भारताचा हा दुसरा कॉर्नर होता अन् तोही हुकला होता. पण, रिबाऊंडवर अमितने सुरेख संधी साधली. रोहिदास अमितने केलेला हा गोल भारताचा वर्ल्ड कप स्पर्धेतील २०० वा गोल ठरला. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने १-० अशी आघाडी कायम राखली. हॉकी वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या संघात ( ३१३) ऑस्ट्रेलिया आघाडीवर आहे. त्यानंतर २६७ - नेदरलँड्स, २३५ - पाकिस्तान, २००* - भारत, १८० - इंग्लंड, १७६ - स्पेन व १५४ - अर्जेंटिना असा क्रमांक येतो.
Rourkelites gears up to support Team India for the #HockeyWorldCup2023 on behalf of India 🇮🇳 #INDvsESP
— Swami Dutta (@swamidutta) January 13, 2023
Just look at the excitement of the crowd here... pic.twitter.com/ety84bIA1B
भारताचा गोलरक्षक कृष्णा पाठकने सुरेख बचाव केला अन् पुढच्याच म्हणजे २६व्या मिनिटाला हार्दिक सिंगने मैदानी गोल करून भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. पहिल्या हाफमध्ये भारताने ७५ टक्के काळ चेंडू स्पेनच्या क्षेत्रात खेळवला. तीन पेनल्टी कॉर्नरपैकी केवळ एक गोल करण्यात भारताला यश आले. स्पेनने एकच कॉर्नर कमावला. भारताचा बचावही जबरदस्त राहिला. तिसऱ्या क्वार्टरच्या दुसऱ्याच मिनिटाला आकाशदीपने पेनल्टी मिळवून दिली, परंतु हरमनप्रीत सिंगचा स्पेनचा गोलरक्षक रफी एड्रीयनने रोखला. हा गोल असल्याचा भारताकडून दावा केला गेला, परंतु रिप्लेत चेंडू गोलपोस्टच्या सीमेवरच थांबल्याचे दिसले अन् गोल नाकारला गेला. ४२व्या मिनिटाला वरून कुमारकडून सोपी संधी चूकली अन्यथा भारताची आघाडी ३-० अशी अधिक मजबूत झाली असती.
अखेरच्या १५ मिनिटांत आता भारताला २-० अशी आघाडी कायम राखून विजय निश्चित करण्यासाठी बचाव अधिक भक्कम करायचा होता आणि त्यात भारतीय खेळाडूंनी कोणतीच उणीव ठेवली नाही. गोलरक्षक कृष्णाने आणखी एक जबरदस्त बचाव केला. सामना संपायला ७ मिनिटं असताना हा गोल रोखला गेल्याने स्पेनचे खेळाडू पूर्णपणे हताश झालेले दिसले. त्यात त्यांच्याकडून पेनल्टी कॉर्नरची संधीवर चूका झाल्या. भारताच्या अभिषेकला पिवळं कार्ड मिळाल्याने १० मिनिटं मैदानाबाहेर बसावे लागले, तरीही एक खेळाडू कमी असूनही भारताच्या बचावात काहीच उणीव जाणवली नाही. भारताने २-० अशी ही मॅच जिंकली. ८ ऑलिम्पिक सुवर्णपदकं नावावर असलेल्या भारतीय हॉकी संघाने केवळ एकदाच वर्ल्ड कप जिंकला आहे.