हॉकी विश्वचषक स्पर्धा: भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 01:42 AM2018-12-09T01:42:05+5:302018-12-09T07:08:43+5:30
हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारताने क गटात शनिवारी कॅनडावर ५-१ ने मात कर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
भुवनेश्वर : हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अखेरच्या सामन्यात भारताने क गटात शनिवारी कॅनडावर ५-१ ने मात कर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. या विजयासह भारताने गटात अव्वल स्थान कायम राखले. कॅनडाकडून एकमेव गोल फ्लोरिस वान सोन याने ३९ व्या मिनिटाला केला.
मध्यंतरापर्यंत कॅनडाने भारताला चांगली लढत दिली. क गटात चांगली कामगिरी केलेल्या भारताला उपांत्यफेरी गाठण्यासाठी या सामन्यात विजय आवश्यकच होता. मात्र सुरुवातीची काही मिनिटे कॅनडाच्या बचावपटूंनी भारतीय आक्रमण चांगलेच थोपवून धरले होते. मनदीपसिंग, सिमरनजीत सिंग, आकाशदीप यांनी रचलेल्या चाली कॅनडाच्या बचावफळीने हाणून पाडल्या. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रितने कॅनडाचा गोलरक्षक किंडलर याला चकवत गोल केला.
दूसऱ्या सत्रातही कॅनडाच्या बचावपटूंनी चांगला खेळ केला. तिसºया सत्रात कॅनडाने आक्रमक धोरण स्विकारले. यामुळे भारतीय खेळाडूंचा खेळ विस्कळीत झाला. सामन्याच्या ३९ व्या मिनिटाला कॅनडाच्या व्हॅन सोन फ्लोरिसने गोल करत संघाला बरोबरी साधून दिली. चौथ्या सत्रात अखेर भारतीय आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करण्यास सुरुवात केली. चिंगलेनसाना सिंहने ४६ व्या मिनिटाला, ललित उपाध्याय याने ४७ आणि ५७ व्या मिनिटाला, अमित रोहिदास याने ५१ व्या मिनिटाला गोल केला.
या विजयासह भारत पूल सीमध्ये सात गुण घेत गोल फरकाच्या जोरावर अव्वल स्थानी आहे. बेल्जिअम दुसऱ्या स्थानावर आहे. तर कॅनडा तिसºया स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला.
भारताने आघाडीवर राहत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. तर अंतिम आठमध्ये स्थान मिळवण्यासाठी बेल्जिअम आणि कॅनडाला क्रॉस ओव्हर लढत खेळावी लागेल. कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका संघाकडे प्रत्येकी एक गुण होता. मात्र गोल फरकाच्या जोरावर कॅनडाने तिसरे स्थान मिळवले. भारत आपली उपांत्यपूर्व लढत १३ डिसेंबर रोजी खेळेल.