हॉकी विश्वचषक :बलाढ्य बेल्जियमचे सलग दुसरे विश्वविजेतेपद पटकावण्याचे ध्येय, जर्मनीविरुद्ध सांभाळून खेळावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 06:01 AM2023-01-29T06:01:49+5:302023-01-29T06:02:16+5:30

Hockey World Cup: सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या बेल्जियमला रविवारी जर्मनीच्या कडव्या झुंजीस सामोरे जावे लागेल. जर्मनीला नमविल्यास बेल्जियम सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविणारा केवळ चौथा संघ ठरेल. 

Hockey World Cup: Mighty Belgium aim to win second consecutive world title, need to play with care against Germany | हॉकी विश्वचषक :बलाढ्य बेल्जियमचे सलग दुसरे विश्वविजेतेपद पटकावण्याचे ध्येय, जर्मनीविरुद्ध सांभाळून खेळावे लागेल

हॉकी विश्वचषक :बलाढ्य बेल्जियमचे सलग दुसरे विश्वविजेतेपद पटकावण्याचे ध्येय, जर्मनीविरुद्ध सांभाळून खेळावे लागेल

googlenewsNext

भुवनेश्वर : सलग दुसऱ्यांदा विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारलेल्या बेल्जियमला रविवारी जर्मनीच्या कडव्या झुंजीस सामोरे जावे लागेल. जर्मनीला नमविल्यास बेल्जियम सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकाविणारा केवळ चौथा संघ ठरेल. 

जर्मनीने कायम पिछाडीवरून पुनरागमन करीत विजयश्री खेचून आणणारा खेळ केला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात आघाडी घेतल्यानंतरही बेल्जियमला गाफील राहून चालणार नाही. त्यामुळेच बेल्जियमला संपूर्ण सामन्यात आक्रमकतेसह सावध पवित्रा घेऊनही खेळावे लागेल. आतापर्यंत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी यांनीच सलग दोनदा हॉकी विश्वचषक उंचावला आहे. या देशांच्या पंक्तीत स्थान मिळविण्याची संधी आता बेल्जियमला मिळाली आहे. याआधी २०१८ मध्ये बेल्जियमने कलिंगा स्टेडियममध्येच विश्वचषक उंचावला होता. 

बेल्जियम संघात ११ खेळाडू ३० हून अधिक वयाचे असून, तीन खेळाडू ३५ वर्षांहून अधिक वयाचे आहेत. त्यामुळे या संघात दांडगा अनुभव आहे. शिवाय याच संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकही पटकाविले होते. त्यामुळे मोठ्या स्पर्धांच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळण्याचा अनुभवही या संघाकडे असल्याने जर्मनीलाही विजयासाठी आपला सर्वोत्तम खेळ करावा लागेल. वेगवान स्ट्रायकर आणि भक्कम बचावपटूंची फळी बेल्जियमची मुख्य ताकद आहे.  महत्त्वाचे म्हणजे जगातील सर्वोत्तम गोलरक्षकांमध्ये गणना होणाऱ्या विन्सेंट वनाशचा भक्कम बचाव भेदण्याचे आव्हान जर्मनीपुढे असेल. 

बेल्जियमने यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत १८ गोल करताना केवळ ५ गोल स्वीकारले आहेत. स्टार स्ट्रायकर टॉम बून याने सर्वाधिक सात गोल केले आहेत. बेल्जियमलाही कधीही हार न मानणाऱ्या जर्मनीविरुद्ध खेळायचे असल्याने त्यांना छोटी चूकही महागात पडेल. या विश्वचषकात जर्मनीने दोनवेळा ०-२ अशा पिछाडीवरून पुनरागमन करीत बाजी मारल्याचे बेल्जियमने विसरू नये. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यातही जर्मनी मध्यंतराला ०-२ अशा पिछाडीवर पडला होता. मात्र, त्यांनी जबरदस्त पुनरागमन करीत दमदार विजयासह अंतिम फेरी गाठली. २००६ सालानंतर पहिल्यांदाच विश्वचषक जिंकण्यासाठी जर्मनी आपल्या पूर्ण ताकदीने खेळेल.

Web Title: Hockey World Cup: Mighty Belgium aim to win second consecutive world title, need to play with care against Germany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.