भारत आशिया चॅम्पियन, संघाचा विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 03:09 AM2017-11-06T03:09:09+5:302017-11-06T03:09:25+5:30

अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी पेनल्टी शूटआऊटदरम्यान गोलरक्षक सविताने अडवलेला गोल निर्णायक ठरला आणि भारताने चीनविरुद्ध ५-४ अशी बाजी मारत दिमाखात महिला

India, Asia champion, direct entry into the team's World Cup | भारत आशिया चॅम्पियन, संघाचा विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश

भारत आशिया चॅम्पियन, संघाचा विश्वचषक स्पर्धेत थेट प्रवेश

googlenewsNext

काकामिगहरा (जपान) : अत्यंत थरारक झालेल्या अंतिम सामन्यात मोक्याच्या वेळी पेनल्टी शूटआऊटदरम्यान गोलरक्षक सविताने अडवलेला गोल निर्णायक ठरला आणि भारताने चीनविरुद्ध ५-४ अशी बाजी मारत दिमाखात महिला आशिया चषक उंचावला. विशेष म्हणजे या जेतेपदासह भारताच्या महिलांनी पुढील वर्षी होणा-या विश्वचषक स्पर्धेसाठीही थेट प्रवेश केला. संपूर्ण स्पर्धेत आपला दबदबा राखलेल्या भारतीय महिलांनी तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा एकदा आशिया चषक उंचावण्याची कामगिरी केली.
सुरुवातीपासून अत्यंत चुरशीच्या झालेल्या या अंतिम लढतीत दोन्ही संघांच्या महिलांनी एकमेकांविरुद्ध आक्रमक चाली रचल्या. २५ व्या मिनिटाला नवज्योत कौर हिने केलेल्या गोलच्या जोरावर भारताने १-० अशी आघाडी घेतली. ही आघाडी भारतीय महिलांनी ४७ व्या मिनिटापर्यंत टिकवली. पण ४७ व्या मिनिटाला टियांटन लुका हिने गोल करत चीनला १-१ गोलबरोबरी साधून दिली. त्यानंतर निर्धारित वेळेत हीच बरोबरी कायम राहिल्याने सामन्याचा निकाल शूटआऊटद्वारे लावण्यात आला. शूटआऊटमध्ये भारतीय संघाने ५-४ गोलने बाजी मारली.
या वेळी राणीने शानदार कामगिरी करताना दोन्ही संधी सत्कारणी लावत गोल केले. याशिवाय, मोनिका, लिलिमामिंज आणि नवज्योत यांनीही महत्त्वपूर्ण गोल केले. पण, सामन्याला खºया अर्थाने कलाटणी दिली ती सविताने. तिने चीनचा एक गोल अप्रतिमरीत्या अडवताना भारताचे जेतेपद निश्चित केले.


1भारताने साखळी फेरीत सर्वच सामन्यांत विजय मिळवला. यानंतर उपांत्यपूर्व फेरीत कझाकिस्तान आणि उपांत्य फेरीत गतविजेत्या जपानला पराभूत केले. भारताने साखळी फेरीत सिंगापूरला १०-०, चीनला ४-१, मलेशियाला २-० असे पराभूत केले होते.2भारतीय संघ याआधी २००९
मध्ये या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. मात्र त्या वेळी चीनने भारताला ५-३ असे पराभूत केले होते.
3भारतीय महिलांनी २००४ मध्ये जपानचा १-० गोलने पराभव करून आशियाई चषक जिंकला होता.

पूर्ण वेळेत सामना १-१ गोल बरोबरीत
सामन्याच्या पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. मात्र दुसºया क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक पवित्रा घेत चीनला दबावाखाली आणले. १७ व्या मिनिटाला नवज्योतचा आक्रमक फटका रोखण्यात आल्यानंतर २५ व्या मिनिटाला नवज्योतने पुन्हा एकदा वेगवान खेळ करत भारताला आघाडीवर नेले. यानंतर चीननेही जोरदार प्रत्युत्तर दिले . तिसºया क्वार्टरमध्येही भारताने आक्रमक खेळ केला. पण, चीनच्या भक्कम बचावापुढे गोल करण्यात भारतीय अपयशी ठरले. चीनच्या मध्यरक्षकांनी शानदार बचाव केले. चौथ्या क्वार्टरमध्येही भारताने वर्चस्व राखले. परंतु, ४७ व्या मिनिटाला चीनने गोल करून सामना रोमांचक केला.
५१ व्या मिनिटाला भारताला गोल करण्याची संधी मिळाली होती. परंतु चीनने भारताचे प्रयत्न हाणून पाडले. सामना संपण्यास तीन मिनिटे शिल्लक असताना चीनला पेनल्टी कॉर्नर मिळाली खरी, परंतु गोलरक्षक सविता लाकडाने अप्रतिम बचाव करताना चीनला यश मिळू दिले नाही आणि सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला.

आशिया कप जिंकल्याबद्दल आणि गुणवत्तेच्या आधारे पुढील वर्षी होणाºया विश्वचषक स्पर्धेसाठी आम्ही पात्र ठरलो, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आमच्या संघात अनेक युवा खेळाडू आहेत, ज्यांनी इतक्या मोठ्या स्तरावर आपला उत्साह आणि चमकदार खेळ दाखवला. आमच्या संघाने चीनला चांगले आव्हान दिले. चीननेही चांगला खेळ करून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये खेचला. ही उच्चस्तरीय स्पर्धा होती आणि आम्ही कोणत्याही सामन्यात कमजोर प्रदर्शन केले नाही. सविताने सडनडेथमध्ये अप्रतिम संरक्षण केले आणि मी त्या वेळी गोल करण्यात यशस्वी ठरले, याचा आनंद आहे. या स्पर्धेतून मिळालेल्या आत्मविश्वासाच्या जोरावर आम्ही आगामी राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धांतही यश मिळवू, अशी अपेक्षा आहे. - राणी, भारतीय कर्णधार.

Web Title: India, Asia champion, direct entry into the team's World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा