Asian Games 2018 : चार हॅटट्रिक, 26 गोल, भारतीय हॉकी संघाने 86 वर्षांनंतर मिळवला असा धडाकेबाज विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2018 02:23 PM2018-08-22T14:23:05+5:302018-08-22T15:04:31+5:30
गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यंदाही आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे.
Next
जकार्ता - गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाने यंदाही आपली विजयी घोडदौड कायम राखली असून, आज झालेल्या लढतीत भारतीय संघाने हाँगकाँगवर गोलची बरसात करत 26-0 अशा फरकाने धुव्वा उडवला. भारतीय हॉकी संघाचा हा आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय ठरला आहे. या लढतीत भारतीय संघाकडून चार हॅटट्रिक नोंदवल्या गेल्या.
#AsianGames2018 : Indian hockey team wins hockey pool A prelims against Hong Kong by 26-0. pic.twitter.com/LLyf3kmA43
— ANI (@ANI) August 22, 2018
एकतर्फी झालेल्या या लढतीत भारतीय संघाने हाँगकाँगवर सुरुवातीपासून गोलचा वर्षाव गेला. या सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला आकाशदीप आणि मनप्रीतने गोल केले. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या मिनिटाला रुपिंदरपाल सिंहने गोल केले. पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस भारताकडे 6-0 अशी आघाडी होती. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्येही भारतीय संघाने सात गोल करून मध्यंतराला आपली आघाडी 13-0 अशी वाढवली.
मध्यंतरानंतरच्या खेळावरही भारतीय संघाचेच वर्चस्व राहिले. तिसऱ्या क्वार्टरअखेर भारताने 18-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने अजून 8 गोल करून आपली गोलसंख्या 26 वर पोहोचवली. भारताकडून हरमनप्रीतने चार, आकाशदीप, रूपिंदर, ललित यांनी प्रत्येकी तीन तर सुनील आणि मनदीप यांनी प्रत्येकी दोन गोल केले. याशिवाय विवेक, अमित, वरुण, दिलप्रीत, चिंग्लेसाना, समरजीत आणि सुरिंदर यांनी प्रत्येकी एक गोल केला.