भारताचा कोरियावर २-१ ने विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 04:55 AM2019-05-21T04:55:34+5:302019-05-21T04:55:40+5:30
महिला हॉकी; तीन सामन्यांच्या मालिकेत घेतली आघाडी
जिंचियोन : भारतीय महिला हॉकी संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान द. कोरियाचा २-१ ने पराभव केला. यासह भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
युवा स्ट्रायकर लालरेम्सियामी हिने २० व्या तसेच नवनीत कौरने ४० व्या मिनिटाला गोल नोंदविला. द. कोरियाकडून शिन हेजेयोंग हिने ४८ व्या मिनिटाला एकमेव गोल केला. यंदा सुरुवातीला स्पेन आणि मलेशियात दमदार कामगिरी करणाऱ्या भारताची येथे आक्रमक सुरुवात झाली. पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नर गमविल्यानंतर भारताने २० व्या मिनिटाला फिल्ड गोल करीत आघाडी मिळविली. नवनीतने ४० व्या मिनिटाला आघाडी दुप्पट केली.
दक्षिण कोरियाला सामन्यात एकूण पाच पेनल्टी कॉर्नर मिळाले. मात्र याचा फायदा घेण्यात त्यांना अपयश आले. यावेळी, भारतीयांनी शानदार कमागिरी करत यजमानांना गोल करण्यापासून रोखले. अखेरच्या क्वार्टरमध्ये कोरियाला पेनल्टी स्ट्रोकही बहाल करण्यात आला. त्यावर यजमान संघाचा एकमेव गोल झाला. गोलरक्षक सविताने सामन्यात प्रभावी कामगिरी बजावली.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन म्हणाले, ‘हा आमचा पहिला सामना होता. निकालाच्यादृष्टीने हा सामना चांगला राहिला. काही नवे प्रयोग केले त्यात खेळाडू यशस्वी ठरले.’ भारत बुधवारी या दौºयातील दुसरा सामना खेळणार आहे. (वृत्तसंस्था)