भारतानं पाकिस्तानचा उडवला धुव्वा, साखळी सामन्यातील सलग तिसरा विजय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2017 06:56 PM2017-10-15T18:56:17+5:302017-10-15T19:20:52+5:30
दोन सहज विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय हॉकी संघानं आशिया कपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला.
ढाका - दोन सहज विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भारतीय हॉकी संघानं आशिया कपमध्ये पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव केला. भारतानं पाकचा 3-1नं धुव्वा उडवत आशिया चषकमध्ये सलग तिसरा विजय नोंवला आहे.
भारताने अ गटात आपलं पहिलं स्थान कायम राखलं. भारतीय संघाच्या या आक्रमणापुढे पाकिस्ताचा संघ पुरता भांबावून गेलेला दिसत होता. भारताकडून 17 व्या मिनीटाला चिंगलीन सानाने गोल झळकावत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. भारताच्या आघाडीच्या फळीतल्या खेळाडूंनी रचलेले हल्ले पाकिस्तानने मोठ्या खुबीने परतवून लावले. त्यामुळे पहिल्याच सत्रात पाकिस्तानवर मोठी आघाडी घेण्याचं भारताचं स्वप्न भंगलं, मध्यांतरापर्यंत भारताकडे 1-0 अशी नाममात्र आघाडी होती. यानंतर भारताने सामन्यात मागे वळून पाहिलंच नाही, संपूर्ण खेळावर आपलं वर्चस्व कायम राखत भारताने पाकिस्तानला पुन्हा एकदा पराभवाचा धक्का दिला.
मध्यांतरानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंवरचा दबाव जाणवायला लागला. भारतीय खेळाडूंना चुकीच्या पद्धतीने टॅकल केल्याप्रकरणी पंचांनी दोन खेळाडूंना येलो कार्ड दाखवत 5 मिनीटासाठी संघाबाहेर केलं. त्यात मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचाही पाकिस्तानला फायदा उचलता आला नाही. अखेर भारताकडून 44 व्या मिनीटाला रमणदीपने गोलपोस्टवरची ही कोंडी फोडत आघाडी 2-0 अशी भक्कम केली. यानंतर अवघ्या एका मिनीटातच भारताचा तरुण ड्रॅगफ्लिकर हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नवर गोल करत भारताचा तिसरा गोल झळकावला. भारताच्या खेळाडूंनी दडपण झुगारुन देत अतिशय सफाईदार खेळ केला.
विशेषकरुन मधल्या आणि आघाडीच्या फळीतलं समन्वय हे आजच्या भारतीय संघाच्या विजयाचं प्रमुख कारणं ठरली.
मात्र 48 व्या मिनीटाला पाकिस्तानच्या अली शानने सुरेख मैदानी गोल झळकावत भारताची आघाडी एका गोलने कमी केली. यानंतर पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरवर गोल झळकावण्याची संधी आली होती, मात्र महाराष्ट्राचा तरुण गोलकिपर आकाश चिकटेने सुरेख बचाव करत पाकिस्तानचं आक्रमण परतवून लावलं.