भारत आशिया चॅम्पियन, मलेशिया पराभूत, विजयासाठी एका दशकाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 03:54 AM2017-10-23T03:54:33+5:302017-10-23T03:54:41+5:30
अफलातून कामगिरी करणा-या भारतीय संघाने रविवारी अंतिम सामन्यात मलेशियाचा २-१ अशा गोलने पराभव करून आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली.
ढाका : अफलातून कामगिरी करणा-या भारतीय संघाने रविवारी अंतिम सामन्यात मलेशियाचा २-१ अशा गोलने पराभव करून आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली. विशेष म्हणजे तब्बल एका दशकानंतर भारताला आशिया चषक हॉकी स्पर्धेत विजेतेपदाला गवसणी घालता आली. भारताचे या स्पर्धेतील हे एकूण तिसरे विजेतेपद ठरले.
याआधी २००३ मध्ये मलेशियातील क्वालालंपूर येथे प्रथम आशियाई चषक हॉकी स्पर्धा जिंकली होती आणि त्यानंतर २००७ साली मायदेशातील चेन्नई येथे झालेल्या स्पर्धेत भारत चॅम्पियन ठरला होता. २०१३ मध्ये मलेशियातील इपोह येथील स्पर्धेत भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अंतिम सामन्यात त्यांना दक्षिण कोरियाकडून पराभव पत्करावा लागला होता.
आज मलेशियाविरुद्ध प्रथमच अंतिम सामन्यात खेळणाºया भारताने रमनदीपसिंहने केलेल्या तिसºया मिनिटाला आणि त्यानंतर ललित उपाध्याय याने २९ व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या बळावर तिसºयांदा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावताना पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानची बरोबरी साधण्यात यश मिळविले.
या स्पर्धेत दक्षिण कोरियाने चार वेळेस आशिया चषक हॉकी स्पर्धा जिंकली आहे. अंतिम सामन्यात मलेशिया संघाने भारताला अखेरपर्यंत कडवी झुंज दिली. त्यांच्याकडून एकमेव गोल शाहरील सबाह याने ५० व्या मिनिटाला केला. जागतिक क्रमवारीतील ६ व्या क्रमांकावर असणाºया भारतासाठी अखेरचे दहा मिनिटे खूपच संघर्षपूर्ण ठरली. यादरम्यान मलेशियाने सातत्याने हल्लाबोल करताना भारतीय बचाव फळीला व्यस्त ठेवले. तथापि, भारतीय बचाव फळीनेदेखील जबरदस्त कामगिरी केली आणि मलेशियाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली नाही.विशेष म्हणजे आशिया खंडातील तीन महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताने आशियाई क्रीडा स्पर्धा, आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया चषक स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम केला. भारताने २०१४ मध्ये इंचियोन आशियाई क्रीडा स्पर्धेत फायनलमध्ये पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये ४-२ अशी धूळ चारली आणि गतवर्षी कुआंटन येथे आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीतही पाकिस्तानवर ३-२ असा विजय मिळविला होता. (वृत्तसंस्था)