भारताची सुरुवात चांगली, लय कायम राखण्याची गरज: सरदार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 04:29 AM2018-12-07T04:29:57+5:302018-12-07T04:30:07+5:30
‘भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषकात सुरुवात चांगली केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी सांघिक खेळ होणे आवश्यक आहे,’ असे भारतीय संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालेला माजी कर्णधार सरदारसिंग याने आवाहन केले आहे.
मुंबई : ‘भारतीय संघाने पुरुष हॉकी विश्वचषकात सुरुवात चांगली केली असून विजयी लय कायम राखण्यासाठी सांघिक खेळ होणे आवश्यक आहे,’ असे भारतीय संघाच्या कामगिरीमुळे प्रभावित झालेला माजी कर्णधार सरदारसिंग याने आवाहन केले आहे.
सरदार म्हणाला,‘सुरुवात तर चांगली झाली. बेल्जियम, नेदरलँड्स, जर्मनी, अर्जेंटिना आणि आॅस्ट्रेलिया संघ चांगले आहेत. याच ऊर्जेसह पुढेही खेळण्याची गरज आहे.’ क गटात समावेश असलेल्या भारताने पहिल्या सामन्यात द. आफ्रिकेला ५-० ने धूळ चारल्यानंतर बेल्जियमला २-२ असे रोखले. पी. आर. श्रीजेशच्या नेतृत्वाखालील संघ उपांत्यपूर्व फेरीच्या दारात उभा आहे. शनिवारी भारताला चौथ्या सामन्यात कॅनडाविरुद्ध खेळायचे आहे. विश्वचषक स्पर्धेच्या काही दिवसआधी निवृत्ती जाहीर करणाऱ्या सरदारने भारतीय संघाने दोन- तीन प्रमुख खेळाडूंवर विसंबून न राहता सांघिक कामगिरीवर भर द्यावा, असे आवाहन केले.