यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास भारत सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:27 AM2018-01-24T01:27:32+5:302018-01-24T01:27:51+5:30
पहिल्या टप्प्यातील अंतिम लढतीत पत्करावा लागलेला पराभव विसरून भारतीय संघ चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील सलामी लढतीत यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे.
हॅमिल्टन : पहिल्या टप्प्यातील अंतिम लढतीत पत्करावा लागलेला पराभव विसरून भारतीय संघ चार देशांच्या आमंत्रित हॉकी स्पर्धेच्या दुस-या टप्प्यातील सलामी लढतीत यजमान न्यूझीलंडच्या आव्हानाला सामोरा जाण्यास सज्ज झाला आहे.
पहिल्या टप्प्यात भारताने जपानचा ६-० ने पराभव केला, पण पुढच्या लढतीत बेल्जियमविरुद्ध ०-२ ने पराभूत झाला. यजमान न्यूझीलंडविरुद्ध ३-१ ने सरशी साधत भारताने अंतिम फेरीत स्थान मिळवले. साखळी फेरीत भारताने ९ गोल नोंदविले आणि तीन स्वीकारले. बेल्जियमने १० गोल नोंदविले आणि सहा स्वीकारले. भारताने साखळी फेरीत अव्वल स्थान पटकावले होते.
भारताचे मुख्य प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी पहिल्या टप्प्यातील कामगिरीबाबत सांगितले, ‘एक संघ म्हणून प्रत्येक लढतीत आमच्या कामगिरीत सुधारणा झाली. भारतीय संघात चार युवा खेळाडू होते. आम्हाला आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या बेल्जियमला पराभूत करण्याची संधी होती. आमचा आत्मविश्वास उंचावला आहे.’
बेल्जियम पूर्ण क्षमतेने या स्पर्धेत सहभागी झाला आहे. जगातील सर्वोत्तम संघांपैकी तो एक आहे. आमच्याकडे असलेल्या संघाचा विचार करता त्यांच्यासोबत तुल्यबळ लढत देणे मोठे यश आहे. या युवा संघाने जागतिक क्रमवारीत तिसºया स्थानावर असलेल्या संघाविरुद्ध खेळण्याचा विश्वास दाखविला. त्यामुळे प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी आणखी पर्याय उपलब्ध झाले आहेत. - शोर्ड मारिन,
मुख्य प्रशिक्षक भारत