भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 05:21 PM2019-03-23T17:21:30+5:302019-03-23T17:21:44+5:30

भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे.

India Start Azlan Shah Campaign on Positive Note, Beat Japan 2-0 | भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले

भारतीय पुरुष हॉकी संघाची दमदार सलामी, आशियाई विजेत्या जपानला नमवले

Next

इपोह : भारतीय पुरुष हॉकी संघाने वर्ल्ड कप स्पर्धेतील निराशाजनक कामगिरीचा इतिहास मागे सोडून नव्या दमाने सुरुवात केली आहे. त्यांन सुलतान अझलान शाह चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात आशिआई स्पर्धेतील विजेत्या जपानवर 2-0 असा विजय मिळवला. वरुण कुमारने 24व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करताना भारताला आघाडी मिळवून दिली आणि त्यात सिमरनजीत सिंगने ( 55 मि.) मैदानी गोल करून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 



भारताला पुढील साखळी सामन्यात कोरियाचा सामना करावा लागणार आहे, त्यानंतर मलेशिया ( 26 मार्च), कॅनडा ( 27 मार्च) आणि पोलंड ( 29 मार्च) यांच्याशी भारतीय संघ भिडेल. गटातील अव्वल दोन संघ अंतिम फेरीत खेळतील.  

पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरीनंतर भारतीय खेळाडूंनी सामन्यावर पकड निर्माण करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या सत्राच्या आठव्या मिनिटाला भारताने पहिला पेनल्टी कॉर्नर मिळवला आणि वरुणने त्यावर गोल केला. कर्णधार मनप्रीत सिंग आणि कोठाजीत सिंग यांनी जपानच्या बचावफळीला चांगलेच झुंजवले. त्यांनी गोल करण्याच्या अनेक संधी निर्माण केल्या, परंतु आघाडीच्या फळीला अपयश आले. दुसरे सत्र संपायला सेकंदाचा कालावधी असताना मनदीप सिंगने सुमीत कुमार ( ज्युनियर)च्या सुरेख पासवर गोल करण्याची संधी गमावली. 



तिसऱ्या सत्रात जपानने पहिला पेनल्टी कॉर्नर कमावला, परंतु पी आर श्रीजेशची बचावभिंत त्यांना ओलांडता आली नाही. भारत आणि जपान यांनी गोल करण्याचे प्रयत्न सुरुच ठेवले. या सत्राच्या अखेरच्या मिनिटात जपानच्या केनजी किटाझॅटोने बरोबरीची संधी गमावली. 

अखेरच्या सत्रात भारतीय खेळाडूंचेच वर्चस्व राहिले. वरुणला आणखी एक गोल करता आला असता, परंतु तो यावेळी अपयशी ठरला. 55 व्या मिनिटाला जपानने गोलरक्षकाला हटवले आणि त्याचा फायदा भारताने उचलला. सिमरनजीत सिंगने गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी मजबूत केली. अखेरच्या मिनिटाला जपानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. श्रीजेशच्या जागी बदली म्हणून आलेल्या कृष्णा पाठकने जपानचा प्रयत्न हाणून पाडला आणि जपानची पाटी गोलशून्यच ठेवली. 
 

Web Title: India Start Azlan Shah Campaign on Positive Note, Beat Japan 2-0

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.