भारताने पटकावले कांस्य पदक; युवा खेळाडूंनी जपानला १-० असे नमविले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2022 08:18 AM2022-06-02T08:18:25+5:302022-06-02T08:18:32+5:30
आशिया चषक हॉकी
जकार्ता : अंतिम फेरीची संधी थोडक्यात हुकल्यानंतर भारताच्या युवा हॉकीपटूंनी अपेक्षित कामगिरी करताना, जपानला १-० असे नमविले. यासह गतविजेत्या भारतीय संघाने यंदाच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत कांस्य पदकावर समाधान मानले. दक्षिण कोरियाविरुद्ध ४-४ अशी बरोबरी मानावी लागलेल्या भारताची गोल अंतराच्या आधारावर अंतिम फेरी हुकली.
एकतर्फी झालेल्या सामन्यात भारताने सुरुवातीला आक्रमक खेळ करत, जपानवर वर्चस्व राखले. सातव्याच मिनिटाला राजकुमार पाल याने केलेल्या मैदानी गोलच्या जोरावर भारताने १-० अशी आघाडी मिळवली. हीच आघाडी अखेरपर्यंत कायम राखताना भारतीयांनी जपानला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही.
पहिल्या पाच मिनिटांच्या खेळामध्ये जपानने भारतीयांना चांगलेच झुंजविले. मात्र, सातव्या मिनिटाला उत्तम सिंगच्या आक्रमक फटक्यावर राजकुमारने चेंडू आपल्याकडे घेतला आणि त्याने अत्यंत चपळाईने चेंडूला गोलजाळ्याची दिशा देत, जपानचा गोलरक्षक तकाशी योशिकावा याला चकविले. तीन मिनिटांनी भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारताला दोन्ही संधी साधण्यात यश आले नाही.
भारताच्या मध्य रक्षकांनी निर्णायक भूमिका बजावताना जपानच्या आक्रमकांना यश मिळू दिले नाही. जपानने चारही क्वार्टरमध्ये भारताच्या गोलजाळ्यावर अनेक हल्ले केले, पण बचावफळीने जपानच्या आक्रमकांना रोखण्यात यश मिळविले. भारताचा भक्कम बचाव भेदण्यात जपानला अखेरपर्यंत यश आले नाही.