भारताने हॉकी मालिका ३-१ अशी जिंकली, द. कोरियाविरुद्ध अखेरचा सामना बरोबरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 01:42 AM2018-03-12T01:42:03+5:302018-03-12T01:42:03+5:30
भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले.
सेऊल - भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी अंतिम लढतीत यजमान दक्षिण कोरियाला १-१ ने बरोबरीत रोखत पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली. दोन्ही संघांनी सामन्याच्या अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोल नोंदवले.
वंदना कटारियाने ४८ व्या मिनिटाला गोल नोंदवत भारताला आघाडी मिळवून दिली, पण पाहुण्या संघाला हा आनंद फार वेळ उपभोगता आला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या बोमी किमने (५० वा मिनिट) दोन मिनिटानंतर बरोबरी साधणारा गोल नोंदवला.
पहिल्या दोन्ही क्वॉर्टरमध्ये उभय संघांनी तुल्यबळ खेळ केला. दुसºया क्वॉर्टरमध्ये यजमान संघाला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले, पण भारतीय गोलकिपर रजनी इतिमारपूने चांगला बचाव करीत प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. भारताला पहिला पेनल्टी कॉर्नर ४१ व्या मिनिटाला मिळला, पण त्याचा लाभ घेता आला नाही. कारण दक्षिण कोरियाच्या मिजिन हानने त्यावर चांगला बचाव केला. वंदनाने ४८ व्या मिनिटाला राणी रामपालच्या पासवर जोरकस फटका लगावत चेंडूला गोलजाळ्याचा मार्ग दाखविला आणि संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दोन मिनिटांनी दक्षिण कोरियाच्या बुमी किमने संघाला बरोबरी साधून दिली. अखेरच्या १० मिनिटांमध्ये उभय संघांनी आक्रमक खेळ केला, पण त्यांना गोलजाळ्याचा वेध घेता आला नाही. (वृत्तसंस्था)