भारतीय हॉकी संघ नव्या पिढीसाठी विश्वचषक जिंकेल!; क्रीडामंत्री, माजी खेळाडूंनी व्यक्त केला विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:14 AM2022-12-17T06:14:57+5:302022-12-17T06:15:04+5:30
१९८० च्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू झफर इक्बाल म्हणाले, भारत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे.
नवी दिल्ली : १९७५ व्या विश्वविजयाची पुनरावृत्ती करीत २०२३ ला मायदेशात भारतीय हॉकी संघ पुन्हा एकदा विश्वचषक जिंकून नव्या पिढीसाठी प्रेरणास्पद कामगिरी नक्की करेल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि हॉकीतील माजी दिग्गजांनी शुक्रवारी व्यक्त केला. १३ ते २९ जानेवारी या कालावधीत भुवनेश्वर आणि राऊरकेला येथे विश्वचषकाचे आयोजन होणार आहे.
विश्वचषकातील ट्रॉफीचे अनावरण केल्यानंतर क्रीडामंत्री म्हणाले, ‘भारतीय संघ सज्ज असून अन्य १५ संघांचे आव्हान मोडीत काढण्याची आमच्या खेळाडूंची तयारी आहे. माझ्या मते, मायदेशात आमचा संघ विश्वविजेता नक्की बनू शकतो. भारतीय संघाची तयारी, खेळाडूंमधील नवी ऊर्जा आणि आत्मविश्वास पाहून मला विश्वास आहे की भारत विश्व चॅम्पियन बनेल. आम्ही विश्वचषक आणि आगामी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करू,’
भारताने ४७ वर्षांआधी १९७५ ला क्वालालम्पूर येथे विश्वचषक जिंकला होता. ठाकूर पुढे म्हणाले, ‘या प्रतिष्ठित ट्रॉफीचे अनावरण करताना मी आनंदी आहे.
ही स्पर्धा फारच शानदार होईल, असा विश्वास वाटतो. आम्ही सर्वोत्कृष्ट असे आयोजन करू. शानदार आयोजन आणि सर्वोत्तम खेळाच्या बळावर आमचा संघ चॅम्पियन बनून नव्या पिढीला प्रेरणा देईल, यात शंका नाही.
१९८० च्या ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्या भारतीय संघाचे खेळाडू झफर इक्बाल म्हणाले, भारत प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. आता आमचे खेळाडू उच्च दर्जाची हॉकी खेळतात, यात शंका नाही. जर्मनीे, ऑस्ट्रेलिया, बेल्जियम आणि नेदरलँड यांच्याविरुद्ध खेळून जिंकू शकतो, असा विश्वास खेळाडूंमध्ये आला आहे. आघाडीचे चार-पाच संघ एकसारखा खेळ करतात. भारताने ऑलिम्पिक कांस्य जिंकून स्वत:ला सिद्ध केले. विश्वचषक जिंकण्याची जिद्द , कुवत आणि विश्वास या संघात असल्याने भारतीय संघ चषक उंचावेल, असा मला विश्वास वाटतो.
१९७५ च्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार अजितपालसिंग यांनी मात्र विश्वचषकात कुठलाच संघ प्रबळ दावेदार समजला जात नाही, असे मत मांडले. ते म्हणाले, मी यावेळी कोण प्रबळ दावेदार असेल हे सांगू शकणार नाही. भारताकडे चांगली संधी आहे. मात्र, आमच्या खेळाडूंना चांगला खेळ करावा लागेल. सर्वोत्कृष्ट खेळ करीत बलाढ्य संघांना हरवा, यासाठी मी भारतीय संघाला शुभेच्छा देतो.
ध्यानचंद यांचे सुपुत्र आणि ऑलिम्पिक खेळाडू अशोक कुमार म्हणाले, भारतीय संघ फॉर्ममध्ये असून, चांगल्या संघांना नमविण्याची त्यांच्यात ताकद आहे. भारतीय संघ अव्वल तीन संघांमध्ये राहील, असा मला विश्वास वाटतो. ऑलिम्पिक पदक जिंकण्याचा अनुभव फार मोठा असतो. या बळावर भारताला देखील जेतेपदाची संधी असेल.