भारतीय ज्युनिअर हॉकी संघ युवा आॅलिम्पिकसाठी पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:08 AM2018-04-30T01:08:45+5:302018-04-30T01:08:45+5:30
भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने युवा आॅलिम्पिक क्वालिफायरच्या फायनलमध्ये मलेशियावर शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे भारताला आॅगस्ट महिन्यात ब्युनास आयर्स
बँकॉक : भारताच्या ज्युनिअर पुरुष हॉकी संघाने युवा आॅलिम्पिक क्वालिफायरच्या फायनलमध्ये मलेशियावर शूटआऊटमध्ये २-१ असा विजय मिळवला. या विजयामुळे भारताला आॅगस्ट महिन्यात ब्युनास आयर्स येथे होणाऱ्या युवा आॅलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ही स्पर्धा हॉकी फाईव्ह स्वरूपात खेळवण्यात आली.
महिलांच्या फायनलमध्ये सलिमा टेटे हिच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला चीनकडून १-४ गोलने पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतीय महिला संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ निर्धारित वेळेत ४-४ अशा बरोबरीत होता. मलेशियाने ११ व्या मिनिटाला मोहंमद अनुआर याने केलेल्या गोलच्या बळावर आघाडी घेतली; परंतु भारताने पुढच्याच मिनिटात राहुलकुमार राजभार याने केलेल्या गोलच्या जोरावर १-१ अशी बरोबरी साधली. भारताने पुन्हा १८ व्या आणि २० व्या मिनिटाला अनुक्रमे प्रसाद व राजभार यांच्या गोलच्या बळावर ४-२ अशी आघाडी घेतली. डिफेन्सच्या चुकीमुळे त्यांनी २६ व्या आणि ३० व्या मिनिटाला असे दोन गोल गमावले. त्यामुळे अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ ४-४ गोलने बरोबरीत होते.
महिलांच्या गटातील अंतिम सामन्यात चीनने वर्चस्व राखताना सामन्याच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये ४-० अशी आघाडी घेतली. लियू चेनचेंगने तिसºया, चौथ्या मिनिटाला तर जोऊ मेईरोंग हिने चौथ्या व मा निंग हिने आठव्या मिनिटाला गोल केले. भारताकडून एकमेव गोल चेतना हिने १६ व्या मिनिटाला केला.