भारतीय पुरुष उपांत्य फेरीसाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:50 AM2018-04-10T03:50:46+5:302018-04-10T12:16:10+5:30
पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे.
गोल्ड कोस्ट : पदकाचा प्रबळ दावेदार असला तरी अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी राष्ट्रकुल स्पर्धेत मलेशियाविरुद्ध शानदार विजय मिळवण्यास उत्सुक आहे. उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतीय संघाला या लढतीत विजय आवश्यक आहे.
गेल्या दोन स्पर्धांमध्ये रौप्यपदकाचा मानकरी ठरलेल्या भारताला पहिल्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाने अखेरच्या ७ सेकंदामध्ये २-२ ने बरोबरीत रोखले.
पाकिस्तानविरुद्धच्या लढतीतील निराशाजनक कामगिरीनंतर प्रशिक्षक शोर्ड मारिन यांनी दुसरा कुठला तरी संघ सामना खेळत असल्याचे वाटत होते, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर भारताने वेल्स विरुद्ध ४-३ ने विजय मिळवला, पण या लढतीत अपेक्षेनुसार कामगिरी झाली नाही. एफआयएच मानांकनामध्ये मलेशिया भारताच्या तुलनेत खालच्या स्थानी आहे, पण मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील संघाची कामगिरी कमकुवत प्रतिस्पर्ध्याविरुद्ध आणखी खालावते, असा अनुभव आहे. पाकविरुद्धची लढत त्याचे उत्तम उदाहरण आहे. (वृत्तसंस्था)